सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे येथील ‘बागायतदार फार्म स्टे’ कृषी पर्यटनासोबतच जैवविविधतेच्या नोंदीचे महत्त्वाचे काम करत आहे. गेल्या आठवड्यात बॉम्बे सेसिलियनच्या नवीन नोंदणीनंतर आता ‘मलबार ग्लायडिंग फ्रॉग’ (उडणारा बेडूक) या अनोख्या प्रजातीची भर पडली आहे. ओंकार गावडे, विकास कुलकर्णी आणि सुजय गावडे यांना बागायतीच्या परिसरात हा बेडूक आढळून आला, ही झोळंबे गावासाठी पहिलीच नोंद आहे.
‘मलबार ग्लायडिंग फ्रॉग’: पश्चिम घाटातील एक अदभुत उभयचर
महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात आढळणारा हा अनोखा बेडूक उभयचर असून, वर्षातील साधारण आठ महिने निद्रावस्थेत असतो. मान्सूनच्या आगमनानंतर, जून महिन्यात पडणाऱ्या पहिल्या जोरदार पावसात हे बेडूक जागे होतात आणि त्यांचे प्रजनन चक्र सुरू होते. केरळपासून चांदोलीपर्यंतच्या पश्चिम घाटातील जंगलांमध्ये हा सुंदर बेडूक आढळतो. त्याचे टपोरे डोळे आणि आकर्षक हिरवा रंग लक्ष वेधून घेतो. या बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारताना तो तरंगत जातो. यासाठी निसर्गाने त्याच्या पायांच्या बोटांना पातळ पडद्याने जोडले आहे. हा बेडूक निशाचर असल्यामुळे तो दिवसा झोपतो आणि रात्री क्रियाशील होतो.
घरटे बनवण्यासाठी हे बेडूक पाण्याचे डबके किंवा ओहोळ, ज्यावर झाडाची फांदी पसरलेली असेल, अशा जागेला प्राधान्य देतात. ‘मलबार ग्लायडिंग फ्रॉग’चे घरटे अनेक पाने एकत्र करून बनवलेला चिकट, फेसाळ पुंजका असतो.
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली हे तेथील जैवविविधतेमुळे संशोधकांसाठी आवडीचे ठिकाण आहे. आंबोलीत आढळणाऱ्या जवळपास सर्व प्रजाती घाटाखालील पायथ्याच्या गावातही आढळतात. झोळंबे गावात आणि सभोवतालच्या परिसरात अशा प्रकारच्या जैवविविधतेची नोंद झाल्यास भविष्यात अधिक पर्यटक आणि अभ्यासक येतील. यामुळे पर्यटन आणि परिसरातील निसर्ग संवर्धनाला हातभार लागेल, असे झोळंबेचे उपसरपंच श्री विनय गाडगीळ यांनी सांगितले.
उभयचरांचे संवर्धन: आपली सामूहिक जबाबदारी;
भारतात उभयचरांच्या जवळजवळ ४०० हून अधिक प्रजाती आहेत, त्यापैकी साधारण १५० प्रजाती फक्त पश्चिम घाटात आढळतात. काही बेडूक जमिनीवर राहतात, काही जमिनीखाली, तर काही झाडांवर राहणाऱ्या प्रजातीही आहेत. प्रत्येकाचा रंग, आवाज आणि राहण्याची जागा वेगळी आहे. त्यांना पाहणे आणि त्यांच्या हालचाली अनुभवणे हा एक सुखद अनुभव असतो. निसर्गचक्रातील अविभाज्य घटक असल्याने आणि कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणारे असल्याने त्यांचे संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे, असे निसर्ग अभ्यासक श्री महादेव (काका) भिसे यांनी सांगितले.