Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी पुन्हा एकदा मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलनाला सुरुवात केली आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. लाखो मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून काही आंदोलकांनी मुंबई महापालिकेच्या समोर ठिय्या आंदोलन केलं होतं. मात्र, मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर आंदोलकांनी येथील रस्ता मोकळा केला आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींवर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मोठा इशारा दिला आहे. फक्त मुंबईने तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने तुम्हाला मुख्यमंत्री केलं आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले?
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. कारण उपोषणाच्या काळात चौथ्या दिवसांपासून आपोआप तोंडाला पाणी येण्यास सुरूवात होते. पण आज ते दुसऱ्या दिवसांपासून सुरू झालंय. कारण दोन दिवसांपासून प्रवास आणि दोन दिवसांपासून उपोषण. त्यामुळे शरीरावर परिणाम होतोय. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि सरकारला आमचं सांगण आहे, मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. सन्मान द्या, आमचा अपमान करू नका”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
“तुमचे काही मंत्री म्हणतात की आम्ही एकाचं आरक्षण काढून दुसऱ्याला आरक्षण देऊ शकत नाहीत. मात्र, असा गैरसमज पसरवू नका. आमचं आम्हालाच आरक्षण द्या अशी मागणी आमची आहे. उदाहरणार्थ ओबीसीला ३२ टक्के आरक्षण असेल आणि त्यांच्यातील २० टक्के आरक्षण आम्ही काढून घेतलं आणि त्यांना १२ टक्केच ठेवलं याला आरक्षण काढून घेणं असं म्हणतात. मात्र, आम्ही ओबीसींचं आरक्षण काढून मराठ्यांना द्या असं म्हणत नाहीत, तर आमचं म्हणणं असं आहे की आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसीतच आहेत. आम्ही ओबीसीमध्येच आहोत. मराठा आणि कुणबी एकच आहेत, असं आमचं म्हणणं आहे. राज्य अस्थिर करण्याचं काम कोणत्याही मंत्र्यांकडून होऊ नये”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
“आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकारण करायचं आहे. ज्या ठिकाणी मराठा आंदोलक असतील त्यांना माझी विनंती आहे शांत राहा, आपण वाट पाहू. आपल्या गाड्या रस्त्यावर लावण्याऐवजी पोलिसांनी सांगितलेल्या मैदानावर लावा. आंदोलकांनाही माझं सांगणं आहे की अजिबात कोणतंही वेगळं पाऊल उचलायचं नाही. कोणताही गोंधळ घालू नका”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी आंदोलकांना केलं आहे.
‘बीएमसीच्या आयुक्तांचं नाव लिहून ठेवा’ : मनोज जरांगे
आंदोलकांनी काही वेळापासून बीएमसी समोर ठिय्या दिला होता. या संदर्भात बोलताना मनोज जरांगे म्हणाले की,” आंदोलकांना पाणी मिळत नाही, जेवण मिळत नाही. सध्या येथील महापालिकेत प्रशासक असेल. त्यामुळे नियंत्रण सगळं मुख्यमंत्र्यांचं असेल. पण कधीना कधी वेळ बदलत असते. सुट्टी देणार नाही, आंदोलकांचं पाणी तुम्ही बंद केलं. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही नोकरीला आहेत, कोणी काही करू शकत नाही. पण आम्ही चांगल्या चांगल्यांची जिरवली तर तुम्ही काहीच नाहीत. कधी ना कधी बदल होत असतो. तेव्हा सगळा हिशोब होईल. बीएमसीचं आयुक्त कोण आहे त्यांचं नाव लिहून ठेवा”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीस यांना इशारा
“हॉटेल बंद करायला लावले, पाणी बंद करायला लावले, म्हणून मराठा आंदोलक संतापले आहेत. मराठा आंदोलक वैतागावेत म्हणून जर तुमची ही भावना असेल तर मग भाजपामधील मराठा कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं की तुमचे मुख्यमंत्री गोरगरिब आंदोलकांना मुंबईत आल्यानंतर किती त्रास देत आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या डोक्यातून हा गैरसमज काढून टाकावा, तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही मराठ्यांची मने जिंका. मराठा समाजाला आरक्षण द्या. हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाहीत. तसेच तुम्हाला वाटेल की तुम्ही लाठीचार्ज वैगेरे कराल तर तुमच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस तो असेल. कारण तुमच्यामुळे अमित शाह आणि मोदींनाही अडचण होईल. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांना अस्थिर करायचा आहे. पोलिसांना लाठीचार्ज करायला लावायचा आहे. पण आमच्या आंदोलकांना बोट लागता कामा नये. पुन्हा राज्य अस्थिर करू नका. जर राज्य अस्थिर झालं तर त्याला जबाबदार मुख्यमंत्री असतील. फक्त मुंबई तुमची नाही. फक्त मुंबईने तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही तर अवघ्या महाराष्ट्राने तुम्हाला मुख्यमंत्री केलं आहे. त्यामुळे तुम्ही अशी दुही निर्माण करू नका”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.