Manoj Jarange Patil On chhagan bhujbal dropped from Cabinet : महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले आहे. यानंतर भुजबळांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. याबरोबरच त्यांनी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांना अंगावर घेतलं म्हणून मला मंत्री पदापासून दूर ठेवलं गेलं असा आरोप महायुतीमधील नेत्यांवर केला आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून ओबीसींवर कसलाही अन्याय झाला नसल्याचे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छगन भुजबळ यांच्या नाराजीनंतर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी ओबीसीवर काहीही अन्याय झाला नसल्याचे म्हटले आहे. तसेच भुजबळांना तुरूंगात टाकले जाईल असा दावाही त्यांनी केला आहे. मनोज जरांगे म्हणाले की, “ते (छगन भुजबळ) पहिल्यापासून असेच आहेत, त्यांना फक्त खायला लागतं. पण काही दिलं नाही की असं तसं… तो राजकीय विषय आहे, त्यामुळे मला राजकारणात पडायचं नाही. मंत्रीपद द्यायचं की नाही हा सरकारचा विषय आहे. मी त्यांना देऊ नका असं म्हणालो का? तरी ते बरळत राहातात”. मनोज जरांगे पाटील हे एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यांमध्ये देखील ओबीसी नेते आहेत याची आठवण जरांगेंनी यावेळी बोलताना करून दिली. ते म्हणाले की, “मी ओबीसीचा नेता आहे आणि ओबीसी समाज नाराज झाला… कुठं ओबीसी नाराज झाले? कोणी ओबीसी नाराज झाले नाहीत, तुम्हाला हवं तिकडं जा… कधीपर्यंत गोरगरीब ओबीसींच्या जीवावर खाणार? तुम्ही राजकारणी माणूस आहात. तुम्हाला काही दिलं नाही की ओबीसींना दिलं नाही, तुम्हाला दिलं की ओबीसींना दिलं, ही काय पद्धत आहे? आपलं वय काय, आपण किती ज्येष्ठ आहात आपण? सर्व जाती धर्मांना धरून आपण राहिलं पाहिजे. मंत्री झाले की एका जातीचं काम करतात, असं होऊ नये”, असे मनोज जरांगे यावेळी म्हणाले.

“यांनी ओबीसींना तरी काय दिलं? जे झालेत (मंत्री) ते ओबीसी नाहीत का? तुम्ही असाल तरच ओबीसी आणि झालेले ओबीसी नाहीत का? ते काय चावतात काय? म्हणजे सगळं तुम्हालाच ओरबाडायला पाहिजे? हे चांगलं नाही”, असंही जरांगे पाटील यावेळी पुढे बोलताना म्हणाले.

“हे पक्ष मोडणारे आहेत असा आरोपही मनोज जरांगे यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, यांनी शिवसेना मोडली, राष्ट्रवादी मोडली आता भाजपाही मोडून टाकतील. हे शंभर टक्के भाजपा मोडणार. मी दोन तीन महिन्यात त्यांना काहीही बोललो नाही मग माझं नाव घेण्याची काय गरज आहे?”. छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राहणार का? या प्रश्नावर बोलताना जरांगे म्हणाले की, हे भाजपाचा कार्यक्रम करणार. या दोन-चार जणांमुले भाजपविरोधात नाराजी पसरली आहे. नाहीतर भाजपा आणि मराठ्यांचं काही नव्हतं. धनगर मराठ्यात नाराजीदेखील यांनीच परवली आहे.

हेही वाचा>> Uddhav Thackeray On Chhgan Bhujbal : “त्यांच्याबद्दल मला फार वाईट वाटलं”, भुजबळांच्या प्रश्नावर नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

…अन् भुजबळ तुरुंगात जाणार

त्यांनी शिवसेना मोडली, राष्ट्रवादी मोडली, दुसर्‍या पवारांची (अजित पवार) राष्ट्रवादी मोडणार… भाजपासहित सगळे पक्ष मोडणार असेही जरांगे यावेळी बोलताना म्हणाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भुजबळ राहतील का? असा प्रश्न जरांगे यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना जरांगे म्हणाले की, “राहतील का नाही काय माहिती… राहतील, नाहीतर कुठं जातील. नाहीतर ते आतमध्ये (तुरुंगात) टाकून देतील… बेसन भाकर खायला मध्ये जा म्हणतील… लई वेड्यासारखं केलं तर आतमध्येच टाकतील… आता ते (छगन भुजबळ) ओबीसी सरकारच्या अंगावर घालतील… देवेंद्र फडणवीस यांच्या अंगावर ओबीसी घालणार… छगन भुजबळ शंभर टक्के अन्याय झाला म्हणून अंगावर घालणार, मग फडणवीस त्यांना मध्ये (तुरूगांत) फेकून देणार… काही अन्याय झाला नाही, ओबीसी अजिबात नाराज नाही”, असेही मनोज जरांगे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil on chhagan bhujbal leaving ajit pawar ncp after dropped from cabinet devendra fadnavis rak