Manoj Jarange Patil on Raj Thackeray: मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत आंदोलन करत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण होत आहेत. सरकारकडून आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असला तरी अद्याप यातून मार्ग निघालेला नाही. आंदोलनावर विविध राजकीय पक्ष आणि नेते प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी दिलेली प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली. त्यांनी मराठा आंदोलनावरून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवले. मागच्यावेळेस नवी मुंबईत आंदोलकांना भेटायला एकनाथ शिंदे गेले होते. मग यावेळी पुन्हा आंदोलकांना मुंबईत येण्याची गरज का भासली? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला होता.
यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली असून कधीपर्यंत भाजपाची तळी उचलणार? असा सवाल त्यांनी राज ठाकरेंना विचारला आहे.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
ठाण्यात अभिजीत पानसे यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या राज ठाकरे यांना माध्यमांनी मराठा आंदोलनाबाबतचे प्रश्न विचारले. यावेळी ते म्हणाले, “माध्यमांच्या आणि लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं केवळ एकच माणूस देऊ शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देऊ शकतात. कारण मागच्या वेळेस एकनाथ शिंदे हेच नवी मुंबईला गेले होते ना? त्यांनी नवी मुंबईत जाऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला, असे सांगितले जात होते. मग मराठा आंदोलक परत का आले? या सर्व गोष्टींची उत्तरे केवळ एकनाथ शिंदे देऊ शकतात.
मनोज जरांगे पाटील यांचे प्रत्युत्तर
एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी अमित ठाकरे यांच्या विधानसभेतील पराभवावर बोट ठेवले. ते म्हणाले, कधीपर्यंत भाजपाची री ओढणार आहात? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला संपवून टाकतील. तुमच्या स्वतःच्या मुलाला भाजपाने निवडणुकीत पाडले.
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, “मधल्या काळात या दोन्ही भावांना आम्ही मानायला लागलो होतो. पण राज ठाकरेंना मधे मधे काय होते? हेच कळत नाही. ते विनाकरण आम्हाला टोकरत असतात. भाजपाने राज ठाकरेंचा लोकसभेला वापर करून घेतला. पण विधानसभेला त्यांच्या मुलाचा पराभव केला, तरीही राज ठाकरेंना काहीच वाटत नाही.”
राज ठाकरे आम्हाला विचारणारे कोण?
“आम्ही मुंबईला का आलो, हे विचारणारे तुम्ही कोण? तुम्हाला पूर्वी ११ आमदार निवडून दिले होते. ते दुसरीकडे पळून गेले. तुम्ही मराठवाड्यात कशाला येता, हे तुम्हाला विचारले का कधी? तुम्ही पश्चिम महाराष्ट्र आणि बाकी ठिकाणी जाता, तिथे कशाला जाता, हे विचारले का तुम्हाला कधी. आम्ही ठाकरे ब्रँडला चांगले मानत होतो. पण ते ऊठसूट आमच्यावरच बोलतात. देवेंद्र फडणवीस एकदा घरी जेवायला काय आले, ते त्यांचीच तळी उचलत राहतात”, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंवर टीका केली.
न्या. शिंदे समितीबरोबरची चर्चा निष्फळ
इतर मागासवर्गीय समाजाच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याचा सरकारी आदेश निघेपर्यंत माघार नाही या भूमिकेवर मनोज जरांगे-पाटील ठाम असून, मुदतवाढीचा सरकारच्या वतीने न्या. शिंदे समितीचा प्रस्ताव जरांगे यांनी साफ फेटाळून लावल्याने चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली. जरांगे यांच्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी कोणत्याही मंत्र्याने त्यांच्याशी अद्याप चर्चा केलेली नाही. जरांगे यांच्या आझाद मैदानातील आंदोलनाला पोलिसांनी आणखी एक दिवसाची मुदतवाढ दिली असली तरी जरांगे यांची कठोर भूमिका लक्षात घेता, या प्रश्नावर सरकारची कोंडी झाली आहे.