Maratha Reservation Protesters Tried To Enter Cricket Club Of India: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. कारण आंदोलकांनी क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. सीसीआयने याबाबत अधिकृत निवेदन जाहीर केले आहे, ज्यामध्ये दावा केला आहे की, सुरक्षारक्षक आंदोलकांना आवारात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी क्लबचे प्रवेशद्वार बंद केले आहेत.
दरम्यान, यावेळी काही आंदोलकांनी शेअर बाजाराचे मुख्यालया असलेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्येही ७ ते ८ आंदोलकांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे.
मुंबईतील वाहतकू विस्कळीत
२९ ऑगस्ट रोजी सुरू मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच्या या उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरातून हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाख झाले आहेत. यामुळे मुंबई मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचबरोबर मुंबईतील वाहतूकही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
आंदोलकांनी त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडण्यास नकार दिला आहे. यामुळे मुंबईत प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे, ज्यामुळे शहर ठप्प झाले आहे. मुंबईतील आझाद मैदान आणि जवळच्या इतर परिसरात हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक दाखल झाले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाविरुद्धच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने २६ ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांना प्रशासनाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय आंदोलन करण्यास मनाई केली होती. याचबरोबर असे निरीक्षण नोंदवले होते की, सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी गर्दी करता येणार नाही.
परवानगी मिळाल्यास जरांगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लादलेल्या अटींचे काटेकोरपणे पालन करावे असे न्यायालयाने निर्देश दिले होते. शिवाय, जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मुंबईबाहेर आंदोलन करण्यासाठी पर्यायी जागा देण्याचा राज्य सरकारचा अधिकार आहे, असे न्यायालयाने म्हटले होते.