Chandrashekhar Bawankule On Manoj Jarange : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून मनोज जरांगे हे राज्य सरकारवर जोरदार घणाघात करत आहेत.

या संदर्भात एका सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी महायुती सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी भाषा वापरत जोरदार टीका केली होती. दरम्यान, त्यांच्या या एकेरी भाषेवरून आता राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना इशारा दिला आहे. ‘सरकार उलथवण्याची भाषा करणं किंवा एकेरी भाषेत बोलणं हे महाराष्ट्र सहन करणार नाही’, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

“सरकार उलथवण्याची भाषा करणं योग्य आहे का? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं हे महायुतीचं सरकार आहे. हे सरकार लोकांनी बहुमताने निवडून दिलेलं आहे. ५१.७८ टक्के मते घेऊन महायुती सरकार निवडून आलेलं आहे. अशा सरकारला उलथवण्याची भाषा सुरू आहे. ही भाषा महाराष्ट्रात चीड निर्माण करणारी भाषा आहे. माझी सर्वांना विनंती आहे की महाराष्ट्रात अशा प्रकारे कोणीही चिथावणीखोर भाषा करू नये”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

“आता राहिला प्रश्न मराठा आरक्षणाचा तर मराठा आरक्षण या राज्यात आणण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या राज्यात मराठा समाजाचं आर्थिक सर्वेक्षण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तो कायदा विधीमंडळात आणि उच्च न्यायालयात टीकला. मात्र, सर्वोच्च न्यायालयात अडचणी आल्या. उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यानंतर तो कायदा सर्वोच्च न्यायालयात टीकला नाही”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.

“मग ज्यांनी मराठा समाजासाठी आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली, त्या देवेंद्र फडणवीसांना एकेरी भाषेत बोलता, त्यांच्या परिवाराबाबत एकेरी भाषेत बोलता? हे महाराष्ट्र सहन करणार नाही, आम्ही देखील सहन करणार नाही. कोणाचं सरकार उलथवण्याची भाषा करता? ३ कोटी १७ लाख लोकांनी महायुतीला मतदान केलंय. ५१.७८ टक्के मते महायुतीला मिळालेले आहेत. असं सरकार तुम्ही उलथवण्याची भाषा करता? अशा प्रकारच्या भाषा करणं बंद केलं पाहिजे. आंदोलन करायचं तर करा, पण सरकार उलथवण्याची भाषा करणं, एकेरी भाषेत बोलणं किंवा आई-बहिणींवर बोलणं हे कोणीही खपवून घेणार नाही. कालची त्यांची भाषा अर्वाच्च होती”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.