सांगली : शिराळा येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा निधी भाजपचे विद्यमान आमदार सत्यजित देशमुख यांनी रोखला असल्याचा आरोप माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार बैठकीत केला. ३१ ऑक्टोबरपर्यंत काम सुरू झाले नाही तर शिवपुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

नाईक म्हणाले, शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावरील स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. स्मारकासाठी आणलेला निधी रोखून स्मारकाला खिळ घालण्याचे पाप विद्यमान आमदारांनी केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकरवी अडीच महिन्यांपासून स्मारकाचे काम रोखून धरले आहे.

शिराळा मतदारसंघातील विद्यमान लोकप्रतिनिधी हिंदुत्वाचा नारा देऊन निवडून आले आहेत. याच लोकप्रतिनिधींनी शिराळा भुईकोट किल्ल्यात होणाऱ्या समस्त हिंदूचा अभिमान असलेले छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामास खीळ घालावी हे दुर्दैव आहे. शिराळा तालुक्याला अभिमान वाटावा असा पराक्रम या भुईकोट किल्ल्यावर झाला आहे. मुघलांनी संगमेश्वरला संभाजी राजांना अटक केल्यानंतर घेऊन जात असताना इतिहासात एकमेव शिराळ्यात त्यांना सोडविण्याचा प्रयत्न झाला. हा झाकोळलेला इतिहास चिरंतन जपला जावा. तो प्रामुख्याने येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरावा, यासाठी लोकप्रतिनिधी असताना या स्मारकाची संकल्पना मांडली असल्याचे नाईक म्हणाले.

ते म्हणाले, की भुईकोट किल्ल्यावर असणाऱ्या ७५ गुंठे भूखंडावर स्मृतिस्थळाचे काम सुरू होणार आहे. यानंतर शासकीय पोलीस वसाहतीची जागा आदी ताब्यात घेऊन येथील उर्वरित काम सुरू होणार आहे. त्यासाठी सुधारित प्रस्ताव २० कोटी रुपयांचा पाठवला होता. त्यापैकी आता १३ कोटी ४६ लाखांचा निधी मंजूर झाला. त्यामधून महाराजांचा अश्वारूढ पुतळा, राजवाड्यात शिल्प चित्राच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा जन्म ते संभाजी महाराजांना इथपर्यंत कशा पद्धतीने आणले गेले हा सगळा इतिहास या ठिकाणी मांडला जाणार आहे.

राज्य शासनाकडून १३ मार्च २०२४ रोजी १३ कोटी ४६ लाख ३९ हजार ६६४ रुपयांच्या आराखड्यास मंजुरी मिळवली. त्यापैकी ९ कोटी ८५ लाख ८२ हजार रुपयांची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आली आली आहे. २० जून २०२५ रोजी निविदा प्रसिद्ध झाली व २६ ऑगस्टला निविदा मंजुरीसाठी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांना दिली आहे. आमदार देशमुख यांच्याकडून राजकीय दबाव टाकून त्या निविदेस मंजुरी होऊ दिलेली नाही. लोकप्रतिनिधी हे विकासकामे करण्यासाठी असतात. मात्र येथील लोकप्रतिनिधी हे स्मृतिस्थळ होऊ नये यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

आरोप निराधार – आ. देशमुख

छत्रपती संभाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे.त्यांच्या स्मारकाचे काम पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. व्यक्ती द्वेषातून माजी आमदार मानसिंगराव नाईक निराधार व बेताल आरोप करत आहेत. त्यांच्याकडून हिंदूत्व शिकण्याची आम्हाला गरज नाही असा प्रतिहल्ला आमदार सत्यजित देशमुख यांनी पत्रकार बैठकीत केला.