Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना व उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची युती होणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. दोन्ही भाऊ या काळात अनेकदा एकमेकांना भेटल्याचंही दिसून आलं. विशेष म्हणजे दोघांनी एकमेकांच्या घरीदेखील हजेरी लावली आहे. त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र येणार असंल सांगितलं जात असलं, तरी त्यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा किंवा चर्चा केली जात नाहीये. त्यातच मनसे महाविकास आघाडीत आल्या ते काँग्रेसला चालेल का? या मुद्द्यावर काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखवलेलं असतानाच आता मनसेच्या बाळा नांदगावकरांनी याबाबत सूचक विधान केलं आहे.
काय म्हणाले बाळा नांदगावकर?
आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना बाळा नांदगावकर यांना राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर नांदगावकर यांनी सविस्तर भूमिका मांडली.
राज ठाकरे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला हजर राहणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, बाळा नांदगावकरांनी ही शक्यता फेटाळून लावली. “त्यांचा एक पक्ष आहे. दसऱ्याला त्यांच्या मेळाव्याची परंपरा आहे. आमचा मेळावा गुढी पाडव्याला होतो. त्यामुळे मला वाटत नाही की कुणी कुणाच्या व्यासपीठावर जाईल आणि विचारसरणी मांडेल. जो तो आपापल्या व्यासपीठावर आपली विचारसरणी मांडत असतो. त्यामुळे निमंत्रण दिलंय किंवा मेळाव्याला जाणार पण व्यासपीठावर नाही येणार वगैरे असं काही झालं असेल असं मला वाटत नाही”, असं बाळा नांदगावकर म्हणाले.
उद्धव ठाकरे युतीसाठी तयार, पण…
दरम्यान, उद्धव ठाकरे युतीसाठी अनुकूल असल्याचं नांदगावकर यांनी नमूद केलं. “उद्धव ठाकरेंची भूमिका जर पाहिली, तर ती दोन्ही भावांनी एकत्र यायला हवं अशी आहे. मग त्यासाठी ते कोणत्याही गोष्टीसाठी तयार आहेत. पण अजूनपर्यंत यावर आमची प्रत्यक्ष काही चर्चा झालेली नाही”, असं ते म्हणाले.
ठाकरे बंधू एकत्र येतीलही, पण काँग्रेसचं काय?
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांबरोबरच काँग्रेसच्या याबाबतच्या भूमिकेचीही चर्चा सुरू झाली. राज ठाकरेंना काँग्रेसचा विरोध आहे. मात्र, काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी यासंदर्भात अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमवीर जर काँग्रेसकडून राज ठाकरेंनी मविआमध्ये येण्याबाबत सकारात्मकता दर्शवली, तर मनसेची काय भूमिका असेल? असा प्रश्न बाळा नांदगावकरांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सूचक शब्दांमध्ये उत्तर दिलं.
“काँग्रेसनं तयारी दाखवली तर मनसे मविआमध्ये जाईल की नाही हा पक्ष प्रमुखांचा विषय आहे. मी त्यावर बोलणं उचित नाही. पक्षप्रमुखच यावर बोलू शकतात. विचारसरणी, ध्येयधोरणे, दिशा यांत फरक असतो. त्यांचा विचार करूनच राज ठाकरे निर्णय घेतील”, असं बाळा नांदगावकर म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं काय?
दरम्यान, दोन्ही पक्ष अद्याप एकत्र आलेले नाहीत, असं नांदगावकर यांनी स्पष्ट केलं. “अजून निवडणुका जाहीर झालेल्या नसताना जरतरवर बोलणं योग्य नाही. स्थानिक निवडणुकांच्या बाबतीत मात्र स्थानिक नेत्यांना विचारात घेऊनच निर्णय घेतला जाईल”, असं त्यांनी नमूद केलं.