दापोली – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या काही पदाधिकाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षातून बडतर्फ केले असून त्यामध्ये पक्षाचे नियम व धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे वैभव खेडेकर (खेड, रत्नागिरी), अविनाश सौंदळकर (राजापूर, रत्नागिरी), संतोष नलावडे (चिपळूण, रत्नागिरी) यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.

मनसे सचिवालयातून जारी करण्यात आलेल्या पत्रकात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कारवाईची नोंद घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

वैभव खेडेकर हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान त्यांना शिवसेनेत पक्षप्रवेशाची ऑफरही शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली होती. त्यानंतर खेडेकर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता त्यांना भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे. यासाठी खेडेकर यांच्या भाजपच्या नेत्यांजवळ भेटीगाठीही झाल्याचं बोलले जात होते. त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री भाजपाचे जिल्हा संपर्क मंत्री नितेश राणे यांनी लक्ष घातल्याची माहिती आहे.

वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश लवकरच होईल असे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे नेते संदीप देशपांडे व अविनाश जाधव यांच्या सही असलेले अधिकृत पत्रकातुन त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा कोकणातील खंदा शिलेदार म्हणजे वैभव खेडेकर. त्यांनी खेड नगरपरिषद राज्यात पहिल्यांदा मनसेकडे निवडून आणली. आता तेच वैभव खडेकर नाराज असल्याच्या चर्चा गेले काही दिवस सुरू होती. त्यांनी ठेवलेले व्हॉट्सअप स्टेटस हाही चर्चेचा विषय ठरला होता. व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवलेल्या मेसेजमुळे या नाराजीला अधिक बळ मिळालं होते. निष्ठावंत कार्यकर्त्यांना कवडीची किंमत नसते हे ठेवलेलं स्टेटस त्यानंतर दुसऱ्या दिवशी ठेवलेला वाघाचा व्हिडिओ तर दुसरा ठेवलेला कारचा व्हिडिओ व कारमधून उतरताना म्हटलेले ‘जय महाराष्ट्र’, यामुळे खेडेकर यांच्या मनात नेमकं चाललंय, असा प्रश्न अनेकांना पडला असून त्यांची पक्षातील खदखद व नाराजी आता लपून राहिलेली नव्हती.

संतोष उर्फ बंड्या शिर्के यांची वर्णी लागणार?

उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष असलेले संतोष नलावडे यांची देखील राज ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याने उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाची जागा रिक्त होणार आहे. या जागेवर आता मनसेचे पूर्वीचे जिल्हाध्यक्ष व २००९ मध्ये दापोली- खेड- मंडणगड मधून मनसेतून विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर शिवसेना त्यानंतर काँग्रेसमध्ये काही काळ राहिलेले संतोष उर्फ बंड्या शिर्के यांनी नुकतीच काँग्रेसला सोडचिट्टी देत पुन्हा एकदा दोन महिन्यापूर्वी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत स्वगृही पक्षप्रवेश करून  दापोली विधानसभा मतदारसंघातील आगामी राजकारणाचे संकेत दिले होते. त्यामुळे या सगळ्या घडामोडी पाहता वैभव खेडेकर यांना पक्षातून हाकलपट्टी नंतर पुन्हा एकदा संतोष शिर्के यांची मनसेच्या उत्तर जिल्हाध्यक्ष पदी वर्णी लागणार का? याबाबत पक्षाध्यक्ष राज ठाकरे कोणता निर्णय घेतात हे पाहणे आता औचित्याचे ठरणार आहे.