मराठी पाट्यांच्या निर्णयामधील ‘त्या’ मुद्द्यावरुन राज ठाकरे संतापले; म्हणाले, “याची काय गरज?, पुन्हा आठवण…”

“इथे फक्त मराठीच चालणार याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका”

Raj Thackeray, राज ठाकरे, MNS, Marathi name plates must in Maharashtra, Marathi name plates on shop must in Maharashtra,
"इथे फक्त मराठीच चालणार याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका" (File Photo)

राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा आदेश दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी हा निर्णय घेतला. यावेळी राज्य सरकारने काही महत्वाच्या अटींचाही उल्लेख केला आहे. आदेशात अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या सर्व आस्थापने किंवा दुकानांसाठी देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयाबद्दल राज्य सरकारचं अभिनंदन केलं आहे, पण सोबतच एका मुद्द्यावरुन नाराजी जाहीर केली आहे.

सर्व दुकानांना मराठीत नामफलक बंधनकारक ; अन्य भाषांनाही मुभा, पण अक्षरांचा आकार मराठीपेक्षा मोठा नको..

राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पत्र शेअर केलं आहे. “या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरंतर आंदोलन करावं लागून नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या,” असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

“हे श्रेय फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकाचं”

“काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं दुकानावरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेव्हा त्याचं श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच,” असंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे.

महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन

राज ठाकरे यांनी यावेळी महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन केलं आहे. “महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन. सरकारला मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका. याची अंमलबजावणी नीट करा,” असा सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे.

“मराठी भाषेशिवाय इतर भाषा नामफलकांवर ठेवण्याला आक्षेप”

“यात आणखी एक भानगड सरकारनं करुन ठेवली आहे की, मराठी भाषेशिवाय इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका,” असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

निर्णयात काय सांगितलं आहे –

आस्थापनेचा नामफलक हा मराठीबरोबरच इतर भाषेतही लिहिता येईल. परंतु, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल, अशा दुकानास, बार, रेस्टॉरंटला महापुरुष किंवा आदरणीय महिलांची किंवा गड किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत, असाही निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्यात येईल.

“मुंबईत, महाराष्ट्रात राहायचं आहे विसरु नका”; मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना संजय राऊतांचा इशारा

मराठी भाषेत पाटय़ा असाव्यात, असा नियम असला तरी अनेक दुकानदार त्याकडे दुर्लक्ष करतात. मराठी पाटय़ांसाठी दहा वर्षांपूर्वी मनसेने आंदोलन केले होते. मनसेच्या इशाऱ्यानंतर सर्वत्र मराठी पाटय़ा झाल्या होत्या. पंरतु, अलीकडे पुन्हा मराठीला डावलून फक्त इंग्रजीमध्ये पाटय़ा लावण्याचे प्रकार वाढले होते. मराठी पाटय़ांची सरकारने सक्ती केल्याने सर्व पाटय़ा मराठीत होतील, अशी अपेक्षा आहे. तमिळनाडू वा कर्नाटकात त्या त्या भाषांमध्येच पाटय़ा लावणे सक्तीचे असून, कोणी तमीळ किंवा कन्नड भाषांना डावलण्याची हिंमतही करू शकत नाही. राज्यात व विशेषत मुंबई, ठाण्यात मराठीला डावलून इंग्रजीमध्ये पाटय़ा लावण्याचे प्रकार अलीकडे वाढले होते. मराठी पाटय़ांसाठी सरकार किती ठाम राहते यावरच या निर्णयाची अंमलबजावणी अवलंबून असेल.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने पुन्हा एकदा मराठीच्या मुद्दय़ाला फोडणी दिली आहे. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात शिवसेनेनेही मराठी पाटय़ांसाठी आंदोलन केले होते. महापालिका निवडणूक जवळ आल्याने मराठीचा मुद्दा मुंबईत पुन्हा केंद्रिबदू ठरण्याची चिन्हे आहेत.

पळवाट बंद मराठी पाटय़ांची सक्ती ही दहापेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने व आस्थापनांना लागू होत नसल्याने पळवाट काढली जात होती. राज्यात हजारो छोटे दुकानदार असून नियमातील त्रुटींमुळे मराठी पाटय़ांच्या सक्तीची अंमलबजावणी करता येत नव्हती, असे उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले. आता दुकाने व आस्थापना अधिनियमातही दुरूस्ती करून सरसकट सर्व दुकानांसाठी मराठी पाटय़ा बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns raj thackeray on marathi name board decision sgy

Next Story
“राज्यात ऑक्सिजनच्या मागणीत वाढ, फेब्रुवारीत रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या….;” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी