उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील असं संजय राऊत यांनी म्हटलंं होतं. पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे उत्तम चेहरा आहेत. मात्र, २०२४ कोण होईल यापेक्षा विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे हे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्यांच्या विधानानंतर मनसेने त्यांची खिल्ली उडवत एक खोचक ट्विट केलं आहे. मज्जा आहे बुवा एका माणसाची असं ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. या ट्विटची बरीच चर्चा सोशल मीडियावर होते आहे. एवढंच नाही तर ठाण्यात गारांचा पाऊस झालाय. तसंच राज्यातल्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी आहे. त्यामुळे या पावसाने शेतकऱ्याला रडवलं आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात काय काय घडामोडी घडतात? इतर काय गोष्टींचे अपडेट्स येतात हे जाणून घेण्यासाठी वाचा आमचा हा लाइव्ह ब्लॉग. जाणून घ्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या अपडेट्स
तीन दिवसांपूर्वीच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. अशातच काल रात्री पुणे, मुंबई राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच गारपीठ झाल्याचंही बघायला मिळालं. काही ठिकाणी होळी दहनाचा कार्यक्रम सुरू असतानाच पाऊस आल्याने अनेकांची तारांबळ उडाली होती. दरम्यान, या गारपिटीने पिकांचं मोठं नुकसान झालं असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
अन्नपदार्थातून विषारी ओैषध दिल्याने श्वानाच्या तीन पिलांचा मृत्यू झाल्याची घटना वारजे भागात घडली. या प्रकरणी वारजे पोलिसांनी एकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
खेडमध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाल्यानंतर सगळ्यांचेच धाबे दणाणले आहेत. भाजपा असो किंवा मिंधे गट असो सगळेच भेदरले आहेत. भाजपा जे काही शिंदे गटासोबत करते आहे ते तुम्हाला आत्ता नाही काही कालावधीत कळेल असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटावर आणि भाजपावर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यानंतर संदीप देशपांडेंनी खोचक शब्दांत ट्वीट केलं आहे. “भावी पंतप्रधानांना शुभेच्छा. भंकस वाटली असेल तर माफ करा. पण बुरा ना मानो होली है” असं या ट्वीटमध्ये संदीप देशपांडेंनी म्हटलं आहे. तसेच, “आता तुमच्याशी हिंदीतच बोललं पाहिजे. तुम्ही आता पंतप्रधान होणार.. मज्जा आहे बाबा एका माणसाची”, अशा शब्दांत संदीप देशपांडेंनी टोला लगावला आहे.