गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांवरून सुरू असलेलं राजकारण आता चांगलंच तापलं आहे. एकीकडे राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिलेला असताना असं करता येणार नसल्याची ठाम भूमिका सरकारनं घेतली आहे. भोंगे न उतरल्यास मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन करत हनुमान चालीसा पठणाचं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्र्यांना देखील आपल्या घरातच हनुमान चालीसा पठण करावं, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला होता. आता नवनीत राणा आणि रवी राणा यांनी येत्या २३ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं निवासस्थान अर्थात मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी थेट शिवसेनेला इशारा दिला आहे.

“बाळासाहेबांचा विसर पडलाय का?”

तुम्हाला बाळासाहेबांचा विसर पडला आहे का? असा सवाल नवनीत राणा यांनी शिवसेनेला विचारला आहे. “तुम्हाला बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे का? आम्ही धमकी देणारे लोक नाही. आमच्या रक्तात धमकी देणं नाहीये. पण काही शिवसेना कार्यकर्त्यांनी आम्हाला खुली धमकी दिली. त्यांनी म्हटलं ज्या पायांवर तुम्ही येत आहात, त्या पायांवर तुम्हाला जाऊ देणार नाही. पण मी त्यांना सांगते की मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. ही दुहेरी ताकद माझ्या पाठिशी आहे. मला कुणीच थांबवू शकत नाही”, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

“मातोश्रीवर येणं फार सोपं वाटत असेल तर त्यांनी आजमून पहावं”, राणा दांपत्याला जाहीर आव्हान

“ज्याच्यात ताकद असेल त्यांनी वेळ दिला नाही म्हणून आम्ही वेळ दिला की आम्ही कोणत्या तारखेला तिथे येऊन हनुमान चालीसाचं वाचन करणार आहोत. त्याप्रमाणे आम्ही मुंबईत जाणार आहोत. आमचे बहुतेक कार्यकर्ते तिथे पोहोचणार आहेत. आम्ही हनुमान चालीसा तिथे म्हणणार हे नक्की आहे”, असा ठाम निर्धार नवनीत राणा यांनी बोलून दाखवला.

“महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंमुळेच आजचं संकट”

आज महाराष्ट्रावर ओढवलेलं संकट उद्धव ठाकरेंमुळे लागल्याचं नवनीत राणा यावेळी म्हणाल्या. “मलाही बघायचं आहे की देवाचं नामस्मरण करण्यात मी कोणती चूक केली आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी आम्ही मुख्यमंत्र्यांना आग्रह केला की हनुमानाच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरात हनुमान चालीसा पठण करावं. पण त्यांनी तसं केलं नाही. महाराष्ट्रात उद्ध ठाकरेंमुळेच आजचं संकट ओढवलं आहे”, असं राणा म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp navneet rana challenges shivsena cm uddhav thackeray on hanuman chalisa pathan pmw