Mumbai Maratha Reservation Protest Manoj Jarange: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे मुंबईत मोठी गर्दी झाली असून, याचा वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, उपोषण सुरू करण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी उपोषणास परवानगी दिल्याबद्दल कौतुक केले. पण जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. याचबरोबर जरांगे पाटील यांनी मुंबईत राज्यभरातून आलेल्या आंदोलकांना शांततेचे आवाहन करत, दगडफेक किंवा जाळपोळ करू नये, असे म्हटले आहे.

यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “कोणीही विसरू नका की आपण समाजासाठी आलो आहोत. आपण लोकांच्या बुद्धीने लालच करून समाजाचे ७० वर्षे वाटोळे केले. त्यामुळे कुठल्याही नेत्याच्या किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे काहीही ऐकू नका. समाज कसा मोठा होईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत.”

मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास परवानगी दिल्याबद्दल सरकारचे आभार मानताना जरांगे पाटील म्हणाले की, “सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हते, म्हणून मराठ्यांनी मुंबई जाम करायचे ठरवले होते आणि मुंबई जामही केली. एक गोष्ट लक्षात ठेवा आता सरकारने आपल्याला सहकार्य केले आहे. परवानगी दिली आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुकही केले आहे. आता त्यांनी सहकार्य केले म्हटल्यावर सरकार आणि पोलिसांना सहकार्य करण्याची जबाबदारी आपली आहे. पण, सोमवारी आणि मंगळवारी जर सहकार्य केले नाही, तर पुन्हा मुंबई जाम करायची.”

…तोपर्यंत मुंबई सोडणार नाही

मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटले की, “सातारा संस्थानाचे गॅझेट लागू करून त्याची आम्हाला तत्काळ अंमलबजावणी हवी आहे. याचबरोबर मराठा आंदोलकांवर असलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि ज्या आंदोलकांनी आरक्षणासाठी बलिदान दिले, त्यांच्या कुटुंबियांच्या ज्या मागण्या आहेत, तसेच समाजाच्या इतर महत्त्वाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही. हा मराठ्यांना शब्द देतो. सरकारने आता मला गोळ्या घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे. पण, मागे हटणार नाही. हा माझा शब्द आहे. कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय. मी समाजालाच कुटुंब मानले आहे. त्यामुळे माझा शब्द खाली पडू देऊ नका. माझ्या कुटुंबाची राखरांगोळी झाली तरी चालेल, पण समाजाचे वाटोळे होऊ देणार नाही.”