भारतीय जनता पार्टीने आजपासून (रविवार) ‘आशीर्वाद यात्रे’ला सुरुवात केली आहे. मुंबईतील सर्व लोकसभा मतदारसंघातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपानं या यात्रेचं आयोजन केलं आहे. आज पहिल्या दिवशी दोन लोकसभा मतदारसंघात भाजपाची ही आशीर्वाद यात्रा जाणार आहे. त्यानंतर ९ आणि ११ मार्च रोजी दोन्ही दिवशी प्रत्येकी दोन मतदारसंघात भाजपाची ही यात्रा जाणार आहे.

भाजपाच्या या आशीर्वाद यात्रेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक टोलेबाजी केली आहे. महाराष्ट्रद्रोह्यानो आशीर्वाद यात्रेत शेतकरी कांदे मारून तुम्हाला आशीर्वाद द्यायला उत्सुक आहेत. तुम्ही आशीर्वाद यात्रा काढून सुरुवात करा जनता तुमच्या पक्षाची प्रेतयात्रा काढून शेवट करतील, अशी टीकाही अमोल मिटकरी यांनी केली. त्यांनी एक ट्वीट करत ही टीका केली आहे.

हेही वाचा- “…तर मी मानहानीचा दावा ठोकणार”, उद्धव ठाकरेंच्या सभेआधी रामदास कदमांचा इशारा

संबंधित ट्विटमध्ये अमोल मिटकरी म्हणाले की, “महाराष्ट्रद्रोह्यानो आशीर्वाद यात्रेत शेतकरी कांदे हाणून तुम्हाला आशीर्वाद द्यायला उत्सुक आहेत. तुम्ही सुरुवातीला यात्रा काढा पण शेवट तुमच्या पक्षाची प्रेतयात्रा काढून शेतकरी समारोप करतील. मागची जन आशीर्वाद यात्रा आठवा, सोबत टिल्ल्याला आणायला विसरू नका. #प्रेतयात्रा”

हेही वाचा- चपलेवरून झालेला वाद जीवावर बेतला, मीरा रोड येथे एकाचा दुर्दैवी अंत

खरं तर, मागील काही दिवसांपासून कांदा पिकाला कवडीमोल दर मिळत आहे. कांद्याचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून कांद्याला योग्य भाव मिळावा, म्हणून शेतकऱ्यांकडून अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. असं असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर कांदा फेकून मारण्याचा प्रयत्नही एका शेतकरी तरुणाने केला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न धगधगत असताना भाजपाने ‘आशीर्वाद’ यात्रेचं आयोजन केलं आहे. यावरून अमोल मिटकरींनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.