ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा घेणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह शिंदे गटाला बहाल केल्यानंतर उद्धव ठाकरेंची ही पहिलीच सभा आहे. त्यामुळे या सभेतून उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सभेआधी रामदास कदम यांनी ठाकरे गटाला इशारा दिला आहे. माझ्यावर काहीही आरोप केले तर मानहानीचा दावा ठोकणार, अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

खरं तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम हे आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय कदम यांनी आज सकाळी रामदास कदम व त्यांचे पुत्र योगेश कदम यांच्यावर जोरदार निशाणा साधला. रामदास कदम हे बंगाली बाबा आहेत. ते पर्यावरण खात्याचे मंत्री असताना मिळालेल्या पैशांतून त्यांनी आपला मुलगा योगेश कदम यांना आमदार केलं, असा आरोप संजय कदम यांनी केली. पण आरोपानंतर उद्धव ठाकरेंच्या सभेआधी रामदास कदम यांनी इशारा दिला आहे.

संजय कदम यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना रामदास कदम म्हणाले, “मला वाटतं की, त्यांचा अजिबात अभ्यास नाही. गावठी आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. पाच वर्षात ते विधिमंडळात कितीवेळा बोलले, याची माहिती काढा, म्हणजे कळेल. मुळात पर्यावरण खात्याला आर्थिक निधीची कोणतीही तरतूद नव्हती. तसेच हे खातंही अस्तित्वात नव्हतं. पर्यावरण खातं हे वेगळं कधीच नव्हतं.

हेही वाचा- ‘एकनाथ शिंदेंकडे कागदावरची शिवसेना’, संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“वन आणि पर्यावरण विभाग असं हे खातं होतं. ते तोडून बाजुला केलं. मला काहीतरी द्यायला पाहिजे, म्हणून उद्धव ठाकरेंनी ते खातं मला दिलं. त्याला शून्य बजेट होतं. पण तलावाच्या सुशोभीकरणासाठी मुनगंटीवारांना सांगून मी निधी घेतला आणि तलावाची कामं केली. तुम्ही जो प्रश्न मला विचारला आहे, त्याबाबत मी न्यायालयात जाणार आहे. त्यांच्यावर मी १०० टक्के मानहानीचा दावा ठोकणार आहे,” अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली.