Sharad Pawar on NCP Group Alliance: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. युती-आघाडीची चर्चा अनेक पक्षांमध्ये सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू होती. मात्र राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही चर्चा मागेच फेटाळून लावली होती. तसेच आज शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड येथील मेळाव्यात बोलताना पक्षाची आगामी वाटचाल आणि संभाव्य युती कुणाबरोबर असेल किंवा विशेष करून कुणाबरोबर नसेल, याचे संकेत दिले आहेत.

शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे बोलत असताना काँग्रेस आणि पुणे जिल्ह्याचा इतिहास थोडक्यात सांगितला. इथे काँग्रेसचा विचार रुजलेला आहे, असे ते म्हणाले. शरद पवार पुढे म्हणाले, एक नवी नेतृत्वाची फळी आपल्याला तयार करावी लागेल. या नेतृत्वाच्या माध्यमातून विकासाचे काम करायचे आहे. येथील नगरपालिका, मनपा अनेक वर्ष काँग्रेसच्या ताब्यात होती. मध्यंतरी काही गडबड झाली आणि भाजपाची सत्ता याठिकाणी आली.

शरद पवार यांनी यावेळी त्यांना १९८० साली सोडून गेलेल्या सहकाऱ्यांचं उदाहरण दिलं. जे सोडून गेले, ते पुन्हा निवडून आले नाहीत, असे सांगितलं. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, कोण आला, कोण गेला याचा अजिबात विचार करू नका. जनता शहाणी आहे. या देशाची लोकशाही आमच्यासारख्या नेत्यांमुळे नाही तर सामान्य माणसाच्या सामुदायिक शहाणपणामुळे टिकली आहे.

“आताच कुणीतरी भाषण करताना म्हटलं की, तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या. पण सगळे म्हणजे कोण?”, असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.

त्या संधीसाधूपणाला प्रोत्साहित करणार नाही – शरद पवार

“हे सगळे म्हणजे गांधी-नेहरू-चव्हाण यांचा विचार, फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार माननारे असतील तर मला मान्य आहे. पण सत्तेसाठी भाजपाबरोबर जाऊन बसणारे लोक असतील तर ते काँग्रेसचा विचार माननारे नाहीत. कुणाशीही संबंध ठेवू पण भाजपाशी संबंधित असलेले लोक काँग्रेसच्या विचारांचे असू शकत नाहीत. त्यामुळे अशा संधीसाधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही”, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली.