राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या बहीण पंकजा मुंडे यांच्याशी असणाऱ्या नात्यात दुरावा आल्याची कबुली दिली आहे. आमचं नातं आता बहीण भावाचं राहिलेलं नाही असं त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना स्पष्ट सांगितलं आहे. आम्ही राजकारणात एकमेकांचे वैरी आहोत असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं. पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यावरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना त्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

काय म्हणाले धनंजय मुंडे –

“आमचं नातं आता बहीण-भावाचं राहिलेलं नाही. आम्ही राजकारणात एकमेकांचे वैरी आहोत. नातेसंबंधं आधी होते, नात्यातून राजकारणात वैर निर्माण झालं. त्यामुळे आपल्या वक्तव्याने, वागण्यामुळे काय परिणाम होतात हे ज्याचं त्याने आत्मपरीक्षण करावं. वारंवार अशी वक्तव्यं करताना, ज्याचं त्याने आकलन करुन त्या पद्दतीने मांडावं,” असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

‘…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत’, पंकजा मुंडेंच्या विधानावर मुनगंटीवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले “पात्रता नसताना…”

पंकजा मुंडेंनी दिली प्रतिक्रिया –

दरम्यान धनंजय मुंडे यांच्या या विधानावर पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की “गोपीनाथ मुंडे यांनी रक्ताचं नातं कधी संपत नाही असं सांगितलं होतं. त्यांनी म्हटलं असलं तरी मी वैर बाळगत नाही. माझ्यासाठी कोणीही राजकीय शत्रू नाही. मी व्यक्तीच्या विचारांशी राजकारणाची तुलना करत असते. राजकारणात मला कोणी वैरी वाटत नाही. जो जनतेच्या हिताचा वैरी, तो माझा वैरी आहे”.

पंकजा मुंडेंच्या कोणत्या वक्तव्यावरुन वाद

“आपण आगामी निवडणुका लढताना काही बदल करुयात. ही निवडणूक पारंपारिक पद्धतीने न लढता वेगळ्या विषयावर निवडणूक लढू. जात-पात, पैसा-अडका, प्रभाव यापलिकडे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मीदेखील वंशवादाचं प्रतिक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदींनीही मला संपवायचं ठरवलं तरी ते संपवू शकत नाहीत,” असं पंकजा मुंडेंनी बीडमध्ये बोलताना म्हटलं. यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या विधानाची चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडेंनी या विधानावर स्षष्टीकरणदेखील दिलं असून विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचं सांगितलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp dhananjay munde on relations with sister pankaja munde sgy