एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो, तो त्रास शरद पवारांच्या बारामतीत भाजपाला होत आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. जयंत पाटील यांनी भाजपा नेत्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“बारामतीमधील जनता कशी आहे याची माहिती आहे, त्यामुळे कोणीही बारामतीत आले तरी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना मिळतेच. बारामतीत सूर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल, परंतु बारामती पवारांना सोडणार नाही एवढं ते घट्ट नातं आहे,” असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

“बारामती महाराष्ट्रात येते त्यामुळे…”; भाजपाच्या ‘मिशन बारामती’बद्दल विचारलं असता फडणवीसांचं सूचक विधान

“बारामतीत कोणता उमेदवार द्यायचा हे भाजपा ठरवेल. भाजपाने सध्या बारामती आणि आमच्यावर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. आम्ही सर्वात मोठ्या लोकांना लक्ष्य केलं आहे, असं वातावरण तयार करायचं अशी भाजपाची पद्धत आहे. मात्र थोड्या दिवसात आमचीही योजना मांडू. त्यावेळी कुणाकुणाला लक्ष्य करतोय हे तुमच्याही लक्षात येईल,” असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.

“सत्ता आहे तर सत्तेत राहून लोकांची कामं करायची सोडून अशा तयारीला लागले आहेत. याचा अर्थ भाजपाला आपली लोकप्रियता कमी व्हायला लागली असल्याचं लक्षात यायला लागलं आहे आणि जेव्हा त्यांची लोकप्रियता कमी होते तेव्हा अशा गोष्टी भाजपा करते,” असा जोरदार हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.

“भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपाने विधानसभेचे तिकीट नाकारले होते. ते का नाकारले याची चर्चा करु इच्छित नाही. परंतु बावनकुळे यांनी शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यांवर अशा पद्धतीने बोलणं त्यांना शोभत नाही,” असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp jayant patil on bjp over baramati sharad pawar sgy