लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपलेली आहे. आता काही महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आता तयारीला लागले असल्याचं पाहायला मिळत आहे. या संदर्भात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. तसेच जागा वाटपासंदर्भातही चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २८८ जागा लढण्याची तयारी सुरू असल्याचं सूचक विधान केलं होतं. त्यातच जागा वाटपाचा मुद्दा सध्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असल्याचंही बोललं जात आहे. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसच्या नेत्यांची जागा वाटपासंदर्भात चर्चेची प्राथमिक फेरी पार पडली आहे. याच अनुषंगाने आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किती जागा लढवणार? याबाबत आमदार रोहित पवार यांनी सूचक भाष्य केलं आहे. तसेच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्षपद सोडणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात जयंत पाटील यांनीच विधान केलं होतं. त्यामुळे नोव्हेबंरनंतर प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा कुणाच्या खांद्यावर? याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. अखेर यावर आता आमदार रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच अजित पवार गटाचे आमदार संपर्कात आहेत का? यावरही रोहित पवार यांनी मोठं भाष्य केलं आहे.

हेही वाचा : “अजित पवारांचं कुटुंब आता वेगळं”, घराणेशाहीवरील टिकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवारांचं विधान

रोहित पवार काय म्हणाले?

विधानसभेच्या जागा लढवण्यासंदर्भात बोलताना रोहित पवार म्हणाले, “आमचं एक मत आहे, पण शेवटी निर्णय शरद पवार घेतील. तसेच त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे नेते घेतील. आमचं मत असं आहे की, जर लोकसभेला मोठं मन दाखवून ठाकरे गटाला आणि काँग्रेस जास्त जागा दिल्या आहेत. आता त्यांनीही मोठं मन दाखवून विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जास्त जागा दिल्या पाहिजेत. शेवटी तो निर्णय त्यांचा आहे. पण कार्यकर्ता म्हणून आमचं मत असेल की, कमीत कमी ८५ आमदार निवडून आणण्याची संधी शरद पवारांनी आम्हाला दिली पाहिजे”, असं सूचक भाष्य रोहित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना केलं.

प्रदेशाध्यक्ष पदाबाबत काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी तुमची तयारी आहे का? या प्रश्नावर बोलताना रोहित पवार म्हणाले, “प्रदेशाध्यक्ष पद रिकामं होणार नाही. जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष राहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सारख्या लोकांना काम करण्याची संधी जर पद आणि पदासकट मिळत असेल तर निश्चतच आवडेल. मात्र, कोणतं पद हे शरद पवार ठरवतील”, असं रोहित पवार यांनी सांगितलं.

अजित पवार गटातील आमदार संपर्कात

“अजित पवार गटात अनेक गोष्टी नॉर्मल आहेत असं वाटत नाही. अनेक लोक पक्ष सोडण्याचा विचारही करत आहेत. आमच्याही संपर्कात जे कुठले आमदार आहेत. त्या सर्वांची भूमिका आहे की, एकदा अधिवेशन होऊद्या. अधिवेशनामध्ये मतदारसंघासाठी निधी मिळू द्या. जे कुठले चांगले आमदार आहेत. ज्यांनी कधीही शरद पवारांच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही किंवा विचाराच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही. असे लोक अधिवेशन झाल्यानंतर नक्कीच येतील असं वाटतं”, असं रोहित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla rohit pawar big statement ajit pawar group mlas are in touch gkt