Amol Kolhe On Ajit Pawar : राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. सध्या निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु असून उद्या (१८ नोव्हेंबर) प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही विविध मतदारसंघात जाहीर सभा पार पडत आहेत. मात्र, एका सभेत बोलताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘तु्म्ही आमच्या निष्ठेबाबत बोलावं का?’, असा सवाल करत तुमचा चष्मा बदला, असा खोचक सल्ला अजित पवारांनी खासदार कोल्हेंना दिला. यानंतर अमोल कोल्हे यांनीही अजित पवार यांना थेट इशारा दिला आहे. “इलाका तुम्हारा आणि धमाका हमारा, तुमच्या मतदारसंघात येऊन उद्या उत्तर देणार”, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता उद्या बारामती मतदारसंघात अमोल कोल्हे काय बोलणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा : “नाद करायचा नाय….”, भरसभेत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा; म्हणाले, “एकदा रस्ता चुकला की…”

अजित पवार काय म्हणाले?

“आमच्या निष्ठेविषयी ते बोलत आहेत. पण आमची निष्ठा याबाबत तुम्ही बोलावं? तु्म्ही आमची निष्ठा काढावी? अजूनही ते उद्या आमच्या निष्ठेविषयी बोलण्याची शक्यता आहे. आमचा शपथविधी होत असताना अमोल कोल्हे टाळ्या वाजवत होते, म्हणत होते की जोरात झालं. आता ते दररोज सभा असली की माझ्या गुलाबी जॅकेटवर बोलतात. पण माझं जॅकेट गुलाबी नाही. आता त्यांना म्हणावं तुमच्या चष्मा बदला. त्या जॅकेटचा रंग गुलाबी नाही”, असं अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना म्हटलं.

अमोल कोल्हे काय म्हणाले?

“आज गुलाबी जॅकेट वाल्यांची एक सभा झाली. त्यामुळे मी आपला चष्मा बघीतला व्यवस्थित आहे की नाही. कारण चष्मा बदलण्याचा सल्ला मिळाला आहे. त्यामुळे म्हटलं आधी चष्मा बरोबर आहे की नाही हे पाहावं. मात्र, यात मजा नाही, म्हणजे कसं आहे तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊन आमच्यावर टीका करणार असाल तर उद्या तुमच्या मतदारसंघात येऊन उत्तर देणार, म्हणजे इलाका तुम्हारा आणि धमाका हमारा”, असा इशारा अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mp sharad pawar group amol kolhe on ajit pawar in baramati assembly election ncp vs ncp politics vidhan sabha election 2024 gkt