अजित पवारांनी भाजपाच्या नादी लागून वडिलांप्रमाणे असलेल्या शरद पवारांना सोडलं, हे लोकांना अजिबात पटलेलं नाही. अजित पवार याबाबत जसं जसं विधानं करत जातील, तसं तसं सुप्रिया सुळेंचे मताधिक्य वाढत जाईल, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंसाठी प्रचार करत असताना माध्यमांनी सुनेत्रा पवार यांच्याबाबत शरद पवारांनी केलेल्या टिप्पणीबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तसेच शरद पवारांनी सुनेत्रा पवार यांना बाहेरून आलेली पवार म्हटल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी अश्रू ढाळले. याबद्दल रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त केले.

रोहित पवार म्हणाले की, सुनेत्रा पवार भावूक झाल्याचे मला कळले. भावूक झालेल्या व्यक्तीबाबत मी काही बोलणार नाही. ही विचारांची लढाई आहे. भाजपाबरोबर गेलेल्या नेत्यांनी भाजपाचा विचार स्वीकारला आहे. आम्ही लहानपणापासून शरद पवार यांना भाजपाच्या विरोधात लढताना पाहत आलो आहोत. कुणाच्या डोळ्यात पाणी आले त्यापेक्षा भाजपाला हद्दपार करायचे आहे, असे लोकांनी ठरविले आहे.

…अन् शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर सुनेत्रा पवारांनी हातच जोडले !

भाजपाचे बारामतीत येऊन शरद पवार यांना संपविण्याची भाषा वापरली. पवारांना राजकीय दृष्टीकोनातू संपविणे हे आमचे स्वप्न असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांसमोरच सांगितले. त्यामुळे भाजपाची हे खेळी बारामतीच्या लोकांना समजली आहे. त्यामुळेच लोक भाजपाचा विरोध करत आहेत, असेही रोहित पवार म्हणाले.

दरम्यान सुनेत्रा पवार यांनीही माध्यमांशी बोलताना आज आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. माझी लढाई नात्यांची नसून राजकीय विचारांची आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. मी सध्या बारामती लोकसभेत प्रचारासाठी गुंतले असून लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

शरद पवारांच्या विधानावर महिला नेत्या नाराज

शरद पवार यांनी सुनेला बाहेरची व्यक्ती म्हटल्यामुळे विविध राजकीय पक्षातील महिला नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवार गटातून रुपाली ठोंबरे पाटील, रुपाली चाकणकर यांनी संतप्त भावना व्यक्त केली. तर राज्याच्या मंत्री अदिती तटकरेंनीही शरद पवारांच्या विधानावर खंत व्यक्त केली. सूनही लेकीसारखेच असते. दुसऱ्या कुटुंबातून सासरच्या कुटुंबाला आपलंसं करणाऱ्या सूनेबाबत असे विधान करणे खेदजनक आहे, असे आदिती तटकरे म्हणाल्या.