पंढरपूर : भागवत धर्माचे प्रसारक, आद्य कीर्तनकार, श्री विठ्ठलाचे लडिवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या षष्ठशतकोत्तर (६७५ वा) संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येथे २३ व २४ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री, खासदार-आमदार, महाराज मंडळी तसेच मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघाचे संस्थापक अध्यक्ष महेश ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याची माहिती ते देत होते. यावेळी एकसंघाचे राष्ट्रीय सचिव व केशवराज संस्थेचे प्रमुख रुपेश खांडके, राष्ट्रीय उपाध्यक्ष नंदकुमार कोसबतवार, प्रदेशाध्यक्ष व संत नामदेव शिंपी समाज पंढरपूरचे अध्यक्ष गणेश उंडाळे, धनंजय गोंदकर, राजेश धोकटे आदी उपस्थित होते. ढवळे म्हणाले, संत नामदेव महाराज व परिवाराच्या षष्ठशतकोत्तर (६७५ वा) संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त बुधवार, २३ व गुरुवार २४ या दोन दिवशी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान असलेल्या येथील संत नामदेव मंदिर येथे पौर्णिमेपासून धार्मिक कार्यक्रम व अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला आहे. बुधवार, २३ जुलै रोजी मुख्य दिवशी सकाळी ९ ते १२ या वेळेत संत नामदेव मंदिर येथे ह.भ.प. नामदास महाराज यांचे संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर आधारित कीर्तन होणार आहे. त्यानंतर गुलाल पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तसेच संत नामदेव मंदिर, संत नामदेव पायरी व श्री विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दर्शन घेणार आहेत. त्यानंतर एल.आय.सी. कार्यालयासमोरील आरती मंडप मनमाडकर हॉल येथे संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. नामदास महाराज कुटुंबातील ५ महाराजांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संत पूजन होणार आहे.
यावेळी मान्यवर मंत्री, महाराज मंडळी उपस्थित राहणार आहेत. तर गुरुवारी, २४ जुलै रोजी सकाळी काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर सायंकाळी संत नामदेव महाराजांच्या पालखीची नगर प्रदक्षिणा होईल अशी माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित राहणार असून त्यांच्या समवेत पालकमंत्री जयकुमार गोरे, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले, माजी आ. प्रशांत परिचारक, अभिनेते गोविंद नामदेव, महाराज मंडळी उपस्थित राहणार आहेत. सर्व कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून शिंपी समाज बांधव, संत नामदेव भक्त मंडळी, महाराज मंडळी उपस्थित राहणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष गणेश उंडाळे यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांनी केली पाहणी
सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या कार्यक्रमाची पाहणी केली. बुधवारी सकाळी मुख्यमंत्री पहिल्यांदा नामदेव पायरी येथे दर्शन घेतील. त्यानंतर संत पूजन कार्यक्रमास उपस्थिती लावतील, अशी माहिती गोरे यांनी दिली. गोरे यांनी विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी आणि संत पूजन या कार्यक्रमाची पाहणी केली.