पंढरपूर : पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीला पंढरीचा विठ्ठल धावला आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना अन्न, पाणी लाडूचे पाकिटे देण्यात आली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा, बार्शी तर पुणे विभागात ही मदत पोहोच केल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. या पूर्वी देखील मंदिर समितीने मदत केली होती.
येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीला धावून आली आहे. मंदिर समितीच्या सदस्यांशी चर्चा करून मदत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती औसेकर महाराज यांनी दिली. या बाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी चर्चा करून सोलापूर जिल्ह्यात कोणत्या पूरग्रस्त गावात द्यावयाच्या आहेत, अशा गावांची आणि कोणाकडे द्यावयाच्या याची माहिती घेतली. यामध्ये अन्नाचे पाकीट, पाण्याची बाटली आणि प्रसादाचा लाडू याचे पाकिटे करण्यात आली.
दोन तीन दिवस टिकेल अशा स्वरूपात अन्न देण्यात आले आहे. यामध्ये बार्शी तालुक्यातील भोईंजे गाव व माढा तालुक्यातील सुलतानपूर आणि पुणे भागात नदीच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसाठी १७०० अन्नपाकिटे, १७०० लाडू प्रसाद पाकिटे आणि २००० पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या प्रशासनाच्या ताब्यात दिल्या आहे. या मदतकार्यावेळी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, शकुंतला नडगिरे, प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखाधिकारी मुकेश आनेचा यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अन्नपाकिटे व आवश्यक साहित्याची पाहणी करून पूरग्रस्त भागात पोहोचविण्याची व्यवस्था केली.
तसेच बार्शी आणि माढा तालुक्यात ५०० अन्न पाकिटे, ५०० पाण्याच्या बाटल्या, ५०० लाडू पाकिटे देण्यात आली आहेत. तर पुणे विभागात ७० अन्नाचे पाकिटे, लाडू पाकिटे, पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्याची माहिती समितीचे अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. या पूर्वी मंदिर समितीने सांगली, कोल्हापूर येथे पूरग्रस्तांना मदत केली होती. तर करोना काळात जनावरांना हिरवा चारा पाणी देण्याचे कार्य समितीने केले. तसेच पंढरपूरमध्ये पूरग्रस्तांना स्थलांतरीत ठिकाणी दोन वेळा चहा, नाष्टा, जेवण दिले आहे. आता पूरग्रस्त नागरिकांना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून केलेली मदत नक्कीच प्रेरणादायी आहे.