लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाल्याने बीडमधले त्यांचे समर्थक गणेश बडे यांनी आत्महत्या केली. पंकजा मुंडे या बीडमधल्या बडे कुटुंबाच्या घरी अंत्यविधीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी कुटुंबाचा आक्रोश पाहून त्यांनाही रडू कोसळलं. गणेश बडे यांच्या दोन्ही मुलींची जबाबदारी ही आता माझी आहे असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसंच कुटुंबाचं सांत्वन करताना त्यांना अश्रू अनावर झाले.

गणेश बडे आणि पोपटराव वायभासे या दोघांच्या आत्महत्या

पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे चिंचेवाडी येथील तरुण पोपटराव वायभासे यांनीही आत्महत्या केली. पोपटराव वायभासे यांनाही पंकजा मुंडेंचा पराभव सहन झाला नाही. गणेश बडे यांच्याप्रमाणेच त्यांनीही त्यांचं आयुष्य संपवलं. पंकजा मुंडेंनी या कुटुंबाचीही भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. त्यावेळी त्यांना रडू कोसळलं होतं.

नेमकं काय घडलं?

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघात पराभव झाला. त्यानंतर शिरुर तालुक्यातल्या वारणी गावात राहणाऱ्या गणेश बडे या तरुणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारांच्या वेळी पंकजा मुंडेही तिथे पोहचल्या. बडे कुटुंबाचं सांत्वन करताना त्यांनाही रडू कोसळलं.

पंकजा मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोनावणे विजयी

बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. या लढतीचा निकाल राज्यात सर्वात शेवटी लागला. त्यामध्ये, पंकजा मुंडेंचा सहा हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे, पंकजा मुंडेंच्या समर्थकांची मोठी नाराजी झाली. आपल्या नेत्या पंकजाताईंचा पराभव झाल्याने अनेकांनी मतदार मतमोजणी केंद्रावरच अश्रू ढाळले. तर, बीड जिल्ह्यात या पराभवाचे पडसादही पाहायला मिळाले. काही ठिकाणी आत्महत्यासारख्या घटना घडल्या. आष्टी तालुक्यातील एका युवकाने पराभव सहन न झाल्याने जीवन संपवले. त्याच आष्टी तालुक्यातील पीडित कुटुंबीयांच भेट घेऊन पंकजा मुंडेंनी अश्रू पुसले. दरम्यान, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही या पोपटराव वायभासे तरुणाच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. तसेच, पीडित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी उचलली आहे.

पंकजा मुंडेंची भावनिक साद

“ज्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं ते सगळे तरुण होते. त्यांना लहान लेकरं आहेत. माझी विनंती आहे की कुणीही जीव देऊ नये. तुम्हाला हिंमतीने लढणारा नेता हवा असेल तर मलाही हिंमतीने लढणारा कार्यकर्ता हवा आहे. यापुढे जर कुणी आत्महत्या केली तर मी राजकारण सोडून देईन. गणेशने अशा प्रकारे पाऊल उचललं. मी आज इथे काय बोलायचं माझ्याकडे शब्दच नाहीत. राजकारणात अनेकदा अनेक ठिकाणी जावं लागतं. आज ही वेळ जी माझ्यावर आली आहे ती कोणत्याही नेत्यावर आली नसेल. बीडमध्ये चार जणांनी जीव दिला आहे. पंकजाताईंचा पराभव सहन होत नाही म्हणून जीव दिला. माझ्यासाठी हे समजण्यापलिकडचं आहे. कार्यकर्त्यांच्या मदतीला, भेटीला मी धावून जाते. गोपीनाथ मुंडे गेले तेव्हा शपथ घेतली होती की लढेन पण रडणार नाही. मात्र आज माझे अश्रू अनावर झाले. ” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.