Parth Pawar Land Deal Controversy: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपनी पुण्यातील जमीन व्यवहारातील अनियमिततेच्या आरोपांमुळे वादात सापडली आहे. यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली आहे. हा करार पुणे शहरातील मुंढवा परिसरातील ४० एकर जमिनीशी संबंधित आहे, जो कोरेगाव पार्क परिसराजवळ आहे.
हे प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी आरोप केला आहे की, ही १८०० कोटी रुपयांची जमीन अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपीला ३०० कोटी रुपयांना विकण्यात आली आहे. या कंपनीत पार्थ पवार, दिग्विजय पाटील नावाच्या व्यक्तीसह भागीदार आहेत. याचबरोबर या व्यवहारात त्यांना २१ कोटी रुपयांची मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आल्याचा आरोप होत आहे. ही जमीन पुणे जिल्ह्यातील महार वतन जमीन आहे.
घोटाळा खरा असेल तर…
दरम्यान, या प्रकरणावर आता शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, “या प्रकरणात दोन गोष्टी आहेत. एक मी ऐकले की, यामध्ये कोणत्यातरी रजिस्ट्रारला निलंबित करण्यात आले आहे. जर ऐवढी मोठी गोष्ट असेल, हा घोटाळा खरा असेल तर या एका निलंबनाने हा विषय संपणार आहे का? आणि दुसरी गोष्ट अशी की, भाजपाच्या मित्रपक्षांना आता कळले असेल की, ते जवळ तर घेतात पण बदनाम करून सोडतात.”
काय आहे प्रकरण?
पुण्यातील महार वतनमधील २७२ व्यक्तींच्या मालकीची असलेली ४० एकर जमीन, १९ मे २०२५ रोजी अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपीने ३०० कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे. या अमेडिया कंपनीत पार्थ पवार हे संचालक आहेत.
या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर मुंबई प्रांताच्या (आताचे महाराष्ट्र) सरकारचे नाव आहे आणि व्यवहारापूर्वी राज्य सरकारची कोणतीही पूर्व परवानगी घेण्यात आलेली नव्हती.
ही जमीन खरेदी १०–१५ वर्षांपूर्वी पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर्सला दिलेल्या पॉवर ऑफ अॅटर्नीच्या आधारे करण्यात आली आहे. तसेच, प्रत्यक्ष खरेदीच्या एक महिना आधी कंपनीने जमिनीवर आयटी पार्क बांधण्यासाठी अर्ज केला होता आणि व्यवहारात मुद्रांक शुल्कात सूट मागितली होती. उद्योग संचालनालयाच्या आशयाच्या पत्राच्या आधारे ही विनंती मंजूर करण्यात आली होती, जी नियमांविरुद्ध आहे.
