अहिल्यानगर: नव्याने सुरू होत असलेल्या नागपूर ते पुणे या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेसाठी अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. खासदार नीलेश लंके यांनी ही माहिती दिली. या रेल्वेचा उद्घाटन सोहळा नगर रेल्वे स्थानकावर रविवारी (दि. १०) आयोजित करण्यात आला आहे.

रेल्वे सल्लागार मंडळाच्या २३ जुलैला झालेल्या बैठकीत अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर विविध गाड्यांना थांबा देण्याची मागणी आपण केली होती. या मागणीची दखल घेऊन वंदे भारत एक्सप्रेसला थांबा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दि. १० ऑगस्टला नागपूरहून या रेल्वे सेवेला सुरुवात होणार आहे. नागपूरहून (अजनी) येथून सोमवार वगळता आठवड्यातून ६ दिवस ही गाडी पुण्याकडे प्रस्थान करेल तर पुण्याहून मंगळवार वगळता आठवड्यातून ६ दिवस ही गाडी नागपूरकडे प्रस्थान करणार आहे.

अजनीहून (नागपूर) पुण्याकडे जाता या रेल्वेचे अहिल्यानगर स्थानकावर सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी आगमन होईल व ७ वाजून ३७ मिनिटांनी पुण्याकडे प्रस्थान होईल. पुण्याहून अजनीकडे प्रस्थान करताना नगर रेल्वे स्थानकावर ही गाडी सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांनी पोहोचेल व ८ वाजून ३५ मिनिटांनी अजनीकडे प्रस्थान करेल. अजनी स्थानकावरून एक्सप्रेस सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी सुटेल तर पुण्याहून सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी नागपूरसाठी सुटणार आहे.

वंदे भारत रेल्वेसारखी उच्च दर्जाची सेवा जिल्ह्याला मिळण्यामुळे रोजगार, शिक्षण, व्यापार, आरोग्य व संपर्क यामध्ये सकारात्मक बदल होईल. नागपूर पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांशी थेट संपर्क सुलभ होईल, असे खासदार लंके यांनी सांगितले.

श्रेयवाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनीही आपल्या पाठपुराव्यातून वंदे भारत रेल्वेला नगरमध्ये थांबा मिळाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे खासदार लंके व अजित पवार गटाचे आमदार जगताप यांच्यामध्ये ‘वंदे भारत’ला मिळालेल्या नगरमधील थांब्यावरून श्रेयवाद निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नगर शहरातील नागरिकांची प्रामुख्याने नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करावी ही खरी मागणी आहे. ती मात्र अनेक वर्षांपासून रखडली आहे. नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रकल्प अहवाल काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. मात्र त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. यापूर्वी खासदार लंके व माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यामध्येही श्रेयवाद रंगला होता.