कराड : काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षासह कराड पालिकेचे माजी पदाधिकारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजपत जाहीर प्रवेश केल्याने काँग्रेससह शिवसेनेच्या दोन्ही गटांना मोठा धक्का बसला असून, भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार डॉ. अतुल भोसले यांची ही मोठी खेळी यशस्वी झाली आहे. त्याचा फटका काँग्रेससह दोन्ही शिवसेनांना सुद्धा बसला आहे . या घडामोडींनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मुंबईतील भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार डॉ. अतुल भोसले, भाजप प्रदेश सरचिटणीस, आमदार विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी काँग्रेसचे माजी कराड शहराध्यक्ष, माजी नगरसेवक राजेंद्र माने, माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर, पालिकेतील माजी विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान, संजय कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. इंद्रजीत गुजर हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तर, स्मिता हुलवान या शिवसेना शिंदे गटाच्या येथील सक्रिय कार्यकर्त्या होत्या.
दरम्यान, डॉ. अतुल भोसले माध्यमांसमोर बोलताना म्हणाले की, कराड नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहराचा विकास व्हावा आणि प्रलंबित प्रश्नांना महायुती सरकारच्या माध्यमातून बळ मिळावे, यासाठी कराड शहरातील नेत्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्ष मजबूत होईल. येत्या काळात असंख्य लोकांना सामावून घेत महायुती मजबूत करण्याचा प्रयत्न आहे.
आज प्रवेश केलेल्या इंद्रजीत गुजर यांनी अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रांसह नगरसेवक म्हणून काम केले आहे. तसेच आप्पा माने यांनी मंगळवार पेठ व परिसराचे प्रतिनिधित्व केले असून, त्यांचा पक्षाला फायदा होईल. संजय कांबळे यांनी तरुणांचे संघटन करून, ज्येष्ठ नागरिक, माता, भगिनींचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेत. कराडमधील महिला संघटिका तसेच नगरपालिकेतील माजी महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान यांनीही पक्षप्रवेश केला आहे. या सर्वांना सोबत घेऊन पक्षवाढ व जनहिताचा प्रयत्न राहील. येत्या काळात सर्वांसोबत चर्चा करून पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी केली जाईल, विक्रम पावसकर यांचा सर्वांना पक्षाकडे आकर्षित करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. आम्ही सर्वांनी मिळून भविष्यासाठी कसे धोरण असावे, यासाठीचीही चर्चा केली असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.
राज्यातील महायुती सरकारकडून ज्यांना विकासकामे करून घ्यायची आहेत, विकासकामांतून कराडचा सकारात्मक चेहरा, मोहरा बदलायचा आहे, त्या सर्वांनी ‘महायुती’त सामील व्हावे, असे आवाहन करत, भाजप सर्वांना बरोबर घेऊन काम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.