पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी (१९ जुलै) एनडीएच्या सर्व घटक पक्षांची बैठक बोलावली होती. दिल्लीत ही बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही एनडीएचे घटक (बाळासाहेबांची शिवसेना) म्हणून उपस्थित होते. तसेच नव्यानेच एनडीएत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. दरम्यान, एनडीएच्या बैठकीनंतर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत चारही नेत्यांनी अर्धा तास चर्चा केली.

या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. या बैठकीत काय चर्चा झाली? असा प्रश्न पटेल यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, आज एनडीएच्या बैठकीत अजित पवार आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपस्थित होतो. या बैठकीला देशातले ३८ राजकीय पक्ष उपस्थित होते. एनडीएच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त या बैठकीचं आयोजन केलं होतं. आमचा पक्ष पहिल्यांदाच यामध्ये सहभागी झाला आहे. यावेळी अजित पवार यांनी आमच्या पक्षाची भूमिका मांडली. आम्ही (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) आता एनडीएचा अविभाज्य भाग आहोत. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) एनडीएबरोबर काम करेल.

दरम्यान, या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “एनडीएला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली एनडीएची आजची बैठक होती. त्यात ३९ पक्ष सहभागी झाले होते. गेल्या ५०-६० वर्षांत सत्ताधाऱ्यांनी विकासाचे जे निर्णय घेतले नव्हते, ते ९ वर्षांत या सरकारने घेतले.”

हे ही वाचा >> सोमय्यांच्या व्हिडीओवरील प्रश्नावर प्रकाश आंबेडकरांचा संताप, दिगंबर साधूंचा…

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडून आता जवळपास दोन आठवडे उलटले आहेत. राष्ट्रवादीच्या नव्या गटाचे प्रमुख अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. तर त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना मंत्रीपदं मिळाली आहेत. तसेच पुढील निवडणुका एनडीएसह लढवण्याचा मानसही अजित पवार गटाकडून बोलून दाखवण्यात आला आहे.