देशात २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले असून, जागावाटप सुरू आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचं अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला प्रत्येकी १२ जागांचं सूत्र ठरवावं, असं मत मांडलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडे अवास्तव जागांची मांगणी करून वंचित दूर जाण्याचं निमित्त शोधत आहे का? असा आरोप केला जातोय. यावर प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

एका यूट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर म्हणाले, “असा आरोप करणाऱ्यांचा मागील निवडणुकीत ४० ठिकाणी पराभव झाला. हे सगळं चोराच्या उलट्या बोंबा आहेत. यांना स्वत:ला काही करायचं नाही. तुमच्याकडे किती मते आहेत? याचा विचार करावा.”

हेही वाचा : वंचितची लोकसभेला महाविकास आघाडीकडे १२ जागांची मागणी, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री म्हणाले…

“तुमची निवडून येण्याची ताकद नाही”

“स्वबळावर निवडून येऊ शकत नाही म्हणून युती होते. स्वबळावर निवडून आला असता, तर आमच्याबरोबर युतीची बोलणी केली नसती. तुमची निवडून येण्याची ताकद नाही. युतीचा प्रयत्न करताना सगळ्यांना समान मित्र म्हणूनच वागवलं पाहिजे,” असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.

“…म्हणून तुम्ही वाटाघाटी करत आहात”

“दुसऱ्या बाजूलाही महायुती आहे. त्यात अजित पवार गटाला ८ आणि एकनाथ शिंदे यांना कमीत-कमी १४ जागा द्याव्या लागतील. बाकी राहिलेल्या २६ जागांवर भाजपा आणि मित्रपक्ष लढेल. आम्ही १२+१२+१२+१२ हे सूत्र ताकद पाहूनच दिलं आहे. शिवसेना १८ जागांवर लढायचं म्हणत असेल, तर त्यांनी कुणाशीही युती केली नसती. मात्र, १८ जागा निवडून येऊ शकत नाही, म्हणून तुम्ही वाटाघाटी करत आहात,” असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

हेही वाचा : बच्चू कडूंना महाविकास आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न करणार का? शरद पवार म्हणाले…

“भाजपाचं काय करायचं ते आम्ही पाहू”

२०१९ साली लोकसभेला वंचितचे सात उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते होती, याबद्दल प्रश्न विचारल्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आमच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते होती. मग, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आमचे उमेदवारांचा पराभव केला, असा आरोप आम्ही करायचा का? पण, मी असा आरोप करणार नाही. मात्र, काँग्रेसनं आरोप करण्यापेक्षा सरळ निवडून लढवू नये. भाजपाचं काय करायचं ते आम्ही पाहू.”