कराड : देशभरात २९ सप्टेंबर रोजी साजरा होणारा शौर्य दिन सातारा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मात्र, वादाच्या भोवऱ्यात सापडला. शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अपंग माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय आणि माजी सैनिक संघटनांना आमंत्रण न देऊन त्यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप माजी सैनिक फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत कदम यांनी केला आहे.

कदम यांनी या संदर्भात महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग, पुणे येथील संचालक (नि.) कर्नल दीपक ठोंगे यांना निवेदन देत सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रवीण बर्गे यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. २९ सप्टेंबर हा दिवस भारतीय लष्कराने २०१६ साली पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या पराक्रमाची आठवण शौर्य दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. या दिवशी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कार्यक्रम आयोजिण्यात आला. परंतु, त्यासाठी केवळ काही निवडक लोकांना आमंत्रित करण्यात आले. तर, माजी सैनिक, अपंग जवान, शहिदांच्या कुटुंबीयांना आणि विविध सैनिक संघटनांना दुर्लक्षित करण्यात आल्याचा आरोप निवेदनात आहे.

२९ सप्टेंबर हा दिवस सैनिकांच्या पराक्रमाचा गौरव करण्याचा आहे. शासनाकडून या कार्यक्रमासाठी निधीही दिला जातो. मात्र, सातारा कार्यालयाने त्या उद्देशालाच हरताळ फासला असून, या प्रकरणाची चौकशी केली असता सैनिक कल्याण अधिकारी आणि संघटकांनी प्रवीण बर्गे यांनी स्वतःच्या निर्णयावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नसताना त्यांनी एकतर्फी निर्णय घेतला आहे. सातारा जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक माजी सैनिक आणि शहीद कुटुंबीय असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याचे माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण न देणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.

(मोर्चाचा इशारा)

या अपमानास कारणीभूत अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून बर्गे यांची तत्काळ बडतर्फी व्हावी, आठ दिवसांत लेखी अहवाल मिळावा, जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक संघटनांची बैठक जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात घेण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली. या मागण्या मान्य न झाल्यास १७ ऑक्टोबरला जिल्हा सैनिक कार्यालयावर ‘सैनिक हक्क मोर्चा’ काढण्यात येईल, असा इशाराही प्रशांत कदम यांनी दिला आहे.