कराड : पश्चिम घाटात कोल्हापूर जिल्ह्याचा अपवाद वगळता तुफान कोसळणाऱ्या मान्सूनपूर्व पावसाचा जोर ओसरला आहे. तरीही ढगाळ वातावरणात पावसाची रिपरिप कायम असल्याने जनजीवन विस्कळीत आहे. रविवारी दिवसभरात पाटण तालुक्यातील पाथरपुंज येथे सर्वाधिक ५९ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
जनजीवन विस्कळीत
आज रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी सात या ११ तासांच्या कालावधीत पाथरपुंजला सर्वाधिक ५९ मिलीमीटर तर, खालोखाल दाजीपुरला ४३, रेवाचीवाडी ४२ व गगनबावडा येथे ४१ मिलीमीटर असा जोरदार पाऊस झाला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडझाप असून, धरणक्षेत्रात कुंभी येथे सर्वाधिक २० मिलीमीटर. वारणा १३, दूधगंगा धरण येथे १२ मिलीमीटर पावसाची नोंद आहे. तर, मोरणा, कास तलाव, धोम, धोम-बलकवडी धारण क्षेत्रात तुरळक पाऊस दिसतो आहे.
शेतकऱ्यांचे गणित गडबडले आठवड्याभरापासून सुरू असलेल्या वळीव पावसासोबतच तळ कोकणात मौसमी पाऊसही येवून धडकल्याने शेतकऱ्यांचे खरीप पिकांच्या पेरणीपूर्व कामांचे गणित गडबडले आहे. शेतकऱ्यांचे खरिपाच्या पेरण्या- टोकण्यासंदर्भात घाईगडबड करून चालणार नाही तर, खूप सावध भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यासाठी वेधशाळेचे अंदाज, कृषी व शासकीय यंत्रणांच्या सूचना, मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याने संबंधित यंत्रणांपुढे हे आव्हान राहणार आहे.
वाहनधारक, प्रवासी त्रासले
वळीव पावसाच्या तडाख्यामुळे जनजीवनाची दैना उडाली आहे. विशेषतः प्रचंड खड्डे, पाण्याचा निचरा नसल्याने अवघ्या रस्त्यावर पाण्याचे साम्राज्य, रेंगाळलेली रस्त्यांची कामे, त्यामुळे महामार्गासह उपमार्गही ठप्प होणे, वाहतूक खोळंबणे, जीव धोक्यात घालून वाहने चालवण्याची वेळ येणे अशा अनेक अडचणींमुळे वाहनधारक, प्रवासी व स्थानिक लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबत संबंधित यंत्रणा बघ्याच्या भूमिकेत असून, लोकांचे हे नुकसान व प्रचंड हाल याची कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नसल्याने त्रासलेल्या जनतेकडून संताप व्यक्त होत आहे.
भाजीपाला महागला
सलग वळीव पावसाने शेताच भाजीपाल्याची नासाडी झाल्याने आवक घटून भाजीपाला दीडपट ते दुप्पट महागला आहे. उन्हाळी भुईमूग, सोयाबीन, घेवडा, कलिंगड, काकडी, आंबा, मका, बाजरी यासह कडधान्याचेही मोठे नुकसान झाल्याने त्याचे दरही वधारण्याची चिंता व्यक्त होत आहे. तसेच खरीपपूर्व मशागतीची कामे होत असतानाच वळवाचा हा तडाखा बसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील तुफान पावसात ३०६ पशुधन दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शेतीजमीन वाहून जाण्याचे संकट
आठवड्याभरातील जोरदार वळीव पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यात कृष्णेसह अन्य नदीकाठच्या जमिनी निसटू लागल्या आहेत. ही एक गंभीर समस्या उभी ठाकली आहे. कृष्णा नदीचा प्रवाह आणि पावसाच्या तडाख्यात पेरले (ता. कराड) येथील उमेश उर्फ चिमणराव कदम व इतरांची साडेचार एकर जमीनच ढासळून वाहून गेली आहे. दुसऱ्या एका अशाच घटनेत वडोली भिकेश्वर (ता. कराड) येथील शेतकऱ्यांची तीन एकर शेतजमीन वाहून नुकसान झाले आहे.