राहाता : देशाला अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी, विकासप्रक्रियेच्या बरोबरीने सनातनी हिंदुधर्म, संस्कृती आणि विचारांच्या आधाराने भारत देश जगज्जेता ठरेल. विधानसभा निवडणुकीत हिंदुत्ववादी संघटनांनी समाजात केलेल्या प्रबोधनामुळेच राज्यात महायुतीचे सरकार येऊ शकले. त्यांच्या आशीर्वादाने मिळालेले हे यश म्हणजे महाराष्ट्राने देशापुढे एक उदाहरण निर्माण केेले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

विश्व हिंदू परिषदेने तीन दिवसांचा युवा संत चिंतन वर्ग शिर्डीत आयोजित केला होता. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील ३०० हून अधिक प्रतिनिधी त्यात सहभागी झाले होते. या चिंतन वर्गाचा समारोप विखे यांच्या उपस्थितीत झाला. स्वामी जितेंद्रनंद सरस्वती, केंद्रीय सहमंत्री हरिशंकर, पश्चिम महाराष्ट्राचे पालक हेमंत हरहरे, भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले, केंद्रीय मंत्री अशोक तिवारी, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, क्षेत्रीय मंत्री संजय मुद्राळे, स्वामी धर्मप्रकाश शास्त्री, सचिन तांबे आदी उपस्थित होते.

मंत्री विखे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आलेला अनुभव पाहता या देशाला अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश बलशाली होत आहे. त्यामुळेच जगातील अनेक देश सध्या चिंताग्रस्त झाले आहेत. म्हणूनच भारतात अराजकता माजवून देश अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशाची हजारो वर्षांची संस्कृती आणि परंपरेवर आक्रमण करण्याचे प्रयत्न होत असले तरी, जातीपातीच्या भिंती तोडून आपल्या माध्यमातून होत असलेले धर्मजागरण, हिंदुधर्म आणि संस्कृतीकरिता सर्वांना एकत्रित करून, जी बांधणी होत आहे, ती महत्त्वपूर्ण आहे.

विकसित देशाची पायाभरणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची संस्कृती आणि विचारधारा जगात पोहोचविण्याचे काम केले. योग आणि आयुर्वेदापासून ते आयोध्येतील राम मंदिर, उजैनचे महाकालेश्वर आणि काशी विश्वेश्वराच्या परिसराला आध्यात्मिक कॉरिडॉर बनवून त्यांनी जगाचे लक्ष वेधले आहे. देशातील जनतेच्या मनात असलेला श्रध्देचा भाव वसुधैव कुटुंबकम या मंत्राने पुढे घेऊन जात असल्याचे मंत्री विखे म्हणाले.

प्रदूषणमुक्त नद्यांसाठी प्रयत्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गोसेवा आयोग स्थापण्याची संधी मला मिळाली, भविष्यात आता प्रदूषणमुक्त नद्यांसाठी आम्ही काम सुरू केले असून, आगामी कुंभमेळ्यापूर्वी नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी जलसंपदा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.