Shankarrao Chavan Government Hospital Nanded Deaths : महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात मागील २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १२ नवजात बालकांचाही समावेश आहे. अवघ्या २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणावरून विरोधकांकडून तोंडसुख घेतले जात आहे. तसंच, राष्ट्रीय पातळीवरही याची दखल घेण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विष्णुपुरी परिसरात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय आहे. रुग्णालयात गेल्या २४ तासांत ६ मुले व ६ मुली या १२ बालकांसह सात स्त्रिया आणि पाच पुरुष दगावले आहेत. मृतांमध्ये सर्पदंश, विषप्राशन तसेच अन्य आजारांचेही रुग्ण होते. यातील काही जण परराज्यातील असल्याचे सांगण्यात आलं.

“महाराष्ट्रातील नांदेड येथील शासकीय रुग्णालयात औषधांच्या कमतरतेमुळे १२ नवजात बालकांसह २४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. भाजपा सरकार आपल्या प्रसिद्धीवर हजारो कोटी रुपये खर्च करते, पण मुलांच्या औषधांसाठी पैसे नाहीत? भाजपाच्या नजरेत गरिबांच्या जीवाची किंमत नाही”, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.

राज्यातील विरोधकांनी काय केली टीका?

या घटनेबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, “रुग्णालयाच्या अधिष्ठांशी चर्चा केली आहे. परिस्थिती निश्चितच चिंताजनक आहे. वैद्यकीय महाविद्यालय असल्यानं शासनानं तातडीनं कारवाई आणि मदत करण्याची आवश्यकता आहे.”

“आरोग्यमंत्री म्हणून तानाजी सावंत अयशस्वी ठरत आहेत. सावंत यांच्या हातात महाराष्ट्राचे आरोग्य दिले, तर ही धोक्याची घंटा आहे. हे मुख्यमंत्र्यांनी समजून घेत फेरबदल करावे”, असे म्हणत शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी तानाजी सावंतांना हटवण्याची मागणी केली.

“ठाण्यातील महापालिका रुग्णालयात झालेल्या मृत्यूनंतर अन्य ठिकाणीही या घटना घडत आहे. कारण, हाफकिनकडून औषधांची खरेदी करण्यात आलेली नाही. अनेक वैद्यकीय आणि सरकारी रुग्णालयांत लोकांचा मृत्यू होत आहे. या मृत्यूंना सरकार जबाबदार आहे,” असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi expressed anger over nanded death said in the eyes of the bjp sgk