Raj Thackeray : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुकीसाठी प्रचारसभा सुरु आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या खडकवासला मतदारसंघात मयुरेश वांजळेंसाठी सभा घेतली. या सभेत राज ठाकरेंनी रमेश वांजळे उभा आहे असंच तुम्हाला वाटेल असं समजूनच मतदान करा असं आवाहन राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) केलं आहे. तसंच पुन्हा एकदा शरद पवार आणि महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोबाइलवर जाऊन जरा बघा जगात काय चाललं आहे-राज ठाकरे

आजकाल सगळ्यांना एक अवयव फुटला आहे त्याचं नाव आहे मोबाइल. त्या मोबाइलवर जाऊन जगभरातली शहरं बघा. कशा प्रकारची शहरं आहेत, शांतता कशी आहे, रुग्णालयं कशी, शाळा कशी? कसं शिकवलं जातं? हे बघा. रोजच्या गरजा संपल्या नाहीत तर माझा तरुण तरुणी नवी स्वप्नं पाहतील कशी? आमच्याकडे रोजच्या गरजांमधून वाट काढता काढता नाकी नऊ येतात. नखं वाढवणारे आणि मिशा वाढवणारे लोक आपल्याकडचे लोक गिनीज बुकात जातात. त्याला अक्कल लागत नाही. जगातले लोक कुठल्या कारणासाठी गिनीज बुकात आहे बघा. असं राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले.

हे पण वाचा- Sharad Pawar : “राज ठाकरे काहीही ठोकून देतात, मूर्खासारखं..” शरद पवारांची खोचक शब्दांत टीका

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला

मुलभूत गरजांकडे लक्ष जाऊ नये म्हणून तुम्हाला जाती-जातींमध्ये विभागून टाकलं आहे. लोकांनाही जातींमध्ये लढवून, गुंतवून टाकलं आहे. आपले महापुरुषही आपण जातींमध्ये विभागून टाकले आहेत. आमचे शिवछत्रपती मराठ्यांचे, बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, महात्मा फुले माळ्यांचे, लोकमान्य टिळक ब्राह्मणांचे असं विभागलं गेलं आहे. २५ वर्षांपूर्वी पर्यंत अशा गोष्टी कुणाच्या मनातही यायचे नाहीत. असं राज ठाकरे म्हणाले आहेत. जातीबद्दल प्रेम हे मी समजू शकतो. पण शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस जन्माला आला आणि त्यांनी जाती-पातींमध्ये द्वेष निर्माण केला. १९९९ पासून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातींमध्ये द्वेष निर्माण झाला. अशी टीका राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) केली आहे.

शरद पवार जिल्ह्याचे नेते, जाणते राजे वगैरे नाहीत

शरद पवार यांच्या बारामतीत जा. तिकडे गेल्यावर लक्षात येईल किती तरी उद्योग, इंडस्ट्री शरद पवारांनी त्या एका तालुक्यात आणले आहेत. मग शरद पवारांना माझा प्रश्न आहे की जर बारामती तालुक्यात तुम्ही इतके उद्योग, व्यवसाय आणू शकता तर मग ते महाराष्ट्रात का आणले नाहीत? आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातला नेता का म्हणायचं? जो महाराष्ट्रात उद्योगधंदे, इंडस्ट्री आणेल, युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवेल तो महाराष्ट्राचा नेता. जो आपल्या तालुक्यात व्यवसाय, उद्योग आणतो तो तालुक्याचा नेता. जाणता राजा वगैरे तर नंतरचीच गोष्ट. असा टोला राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) शरद पवारांना लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray criticized sharad pawar over industries and business what did he say scj