MNS Gudhi Padwa Melava Shivaji Park : गेल्या दीड वर्षांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील अनेकवेळा राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेटी घेतल्या. या भेटींमध्ये काय चर्चा होतायत याबाबत तिन्ही नेत्यांपैकी कोणीही जाहीर वक्तव्य केलं नाही. अशातच गेल्या महिन्यात राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरेंबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राज ठाकरे यांची मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यावर राज ठाकरे यांनी आज (९ एप्रिल) मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात भाष्य केलं.

राज ठाकरे म्हणाले, मी दिल्लीत अमित शाह यांना भेटलो. त्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांनी ‘दिल्लीत जाणारा पहिला ठाकरे’ अशी बातमी दाखवली. खरंतर अनेक नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत असतात. कोणी कोणाला भेटल्याने लहान-मोठा होत नसतो. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला येऊन भेटले होते. अशा भेटींमुळे कोणी लहान-मोठं होत नाही. भेटायला जाण्यात कसला कमीपणा?

मनसे अध्यक्ष म्हणाले, गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्याशी बोलत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला येऊन भेटले आणि अनेकदा मला म्हणाले आपण एकत्र आलं पाहिजे, ‘आपण एकत्र काहीतरी केलं पाहिजे’. मी दीड वर्षांपासून हेच ऐकतोय. मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील तेच म्हणाले, ‘एकत्र यावं आणि काहीतरी करावं’. मी त्यांना विचारायचो की एकत्र यायचं आणि काहीतरी करायचं म्हणजे काय? त्यावर अपेक्षित उत्तर मिळत नसल्याने मीच अमित शाह यांना फोन केला आणि त्यांना विचारलं हे नेमकं काय चाललंय? हे दोघे नेमकं काय बोलतायत ते मला समजत नव्हतं. म्हणून मी अमित शाहांना जाऊन भेटलो. त्यानंतर इथे आल्यावर पुन्हा या दोघांशी (मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री) चर्चा केली. चर्चा पक्षाच्या चिन्हावर आल्यावर मी म्हटलं पक्षाची निशाणी बदलणार नाही.

हे ही वाचा >> राज ठाकरेंची मोठी घोषणा! “फक्त नरेंद्र मोदींसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा!”

राज ठाकरे म्हणाले, माझ्या भेटीनंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की, आता ‘लाव रे तो व्हिडीओ’चं काय करणार? या सगळ्यांसाठी थोडीशी पार्श्वभूमी देतो. माझा जन्म ज्या घरात झाला, त्याच घरात शिवसेनेचा जन्म झाला. मी पहिल्यापासून जे पाहत आलो ते बाळासाहेबांची शिवसेना पाहत आलो. अनेक ठिकाणी गेलो, हिंडलो, फिरलो. त्यामुळे माझ्या आयुष्यातील एकमेव पक्ष होता, शिवसेना. १९८८-८९ च्या आसपास भाजपा शिवसेनेची युती झाली. ती युती झाल्यानंतर शिवसेनेबरोबर सर्वधिक संबंध आले असतील तर भाजपाबरोबर आले. गोपिनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरींबरोबर आले. यांच्याबरोबर जे संबंध होते, ते राजकारणापलिकडे होते.