Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी विदर्भात मनसैनिकांच्या भेटी घेतल्या. सोलापूरमध्ये राज ठाकरेंनी (Raj Thackeray) दोन उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर आणखी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. या विधानसभा निवडणुकीत २०० ते २२५ जागा आपण लढणार आहोत असं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे. यवतमाळ या ठिकाणी असलेल्या वणीमध्ये राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) भाषण करायला सुरुवात केली, त्यावेळी त्यांनी बदलापूरच्या घटनेवर भाष्य केलं. भाषण सुरु असताना पॅराग्लायडरच्या गिरक्या सुरु झाल्या. त्याला पाहून त्यांनी मिश्कील भाष्य केलं.

राज ठाकरे भाषणात काय म्हणाले?

“दिवाळीनंतर विधानसभेची निवडणूक होईल, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने मी राज्याचा दौरा आखला आहे. मराठवाड्याचा दौरा झाला, आता विदर्भाचा दौरा सुरू आहे. यंदा आपण २०० ते २२५ जागा लढणार आहोत. महाराष्ट्राचं राजकीय वातावरण अत्यंत गढूळ झालं आहे. जनता उन्हात उभं राहून मतदान करते आणि मग आमदार विकले जातात. याचा जनतेला राग आला पाहिजे. विधानसभा निवडणूक ही राग व्यक्त करण्याची संधी आहे”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी दिली.

Badlapur Sexual Assault : “४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्र…”, बदलापूर प्रकरणावरून राज ठाकरे आक्रमक; पोलिसांना म्हणाले…

बदलापूर प्रकरणावरही राज ठाकरेंचं भाष्य

बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे म्हणाले, “आज राज्यात छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे होते. ते असते, तर असे गुन्हे करण्याची कुणाची हिंमत झाली नसती. खरं तर महाराजांनी रांझाच्या पाटलाचे हातपाय कापून जसा चौरंगा केला होता, तीच शिक्षा बलात्कार करण्यांना दिली पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत, कारण आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नाही. एकदा माझ्या हातात राज्याची सत्ता दिली, तर कायद्याचा धाक काय असतो, हे आरोपींना दाखवून देईन”, असंही राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले.

“हे सरकार वेळ मारून नेणारे”, शिंदेंना वारंवार भेटणारे राज ठाकरे पहिल्यांदाच… (छायाचित्र – लोकसत्ता टीम/संग्रहित छायाचित्र)

पॅराग्लायडरच्या गिरक्या आणि राज ठाकरेंचं टायमिंग

याच मेळाव्यात व्यासपीठावर राज ठाकरे ही भूमिका मांडत असताना मनसेकडून पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्यात येत होतं. त्याचवेळी राज ठाकरेंचं लक्ष पॅराग्लायडिंग करणाऱ्या व्यक्तीकडे गेलं. त्यांनी विचारलं, “हा माणूसच आहे ना?” त्यावर सगळे हो म्हणाले.राज ठाकरे हे त्यांच्या खास टायमिंगसाठी ओळखले जातात. त्याचाच प्रत्यय यवतमाळमध्येही उपस्थितांना आला. वरती पाहात राज ठाकरे म्हणाले, “हा जो माणूस आहे तो नीट उतरेल ना? साहेब, चुकलो साहेब, चुकलो म्हणत इथपर्यंत येणार नाही ना?” असं राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

पॅराग्लायडिंग का करण्यात आलं?

पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून मनसेच्या (MNS) झेंड्याद्वारे आकाशातून राज ठाकरेंना अभिवादन केलं जात होते. नेमकं राज यांचं भाषण सुरू असतानाच, त्यांच्या डोक्यावर हा पॅराग्लायडिंग करणारा माणूस घिरट्या घालत होता, तेव्हा राज यांनी अरे थांबव रे बाबा.. असे म्हणत ते थांबवायला सांगितलं. भाषणादरम्यान घडलेला प्रसंग चर्चेत आला आहे.