Raj Thackeray And Uddhav Thackeray: गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या चर्चांना आज राज ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा हवा मिळाली आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी किरकोळ वाद बाजूला ठेवत उद्धव ठाकरे यांच्याशी एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या वक्तव्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान या सर्व घडामोडींच्या दरम्यान शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओबरोबर त्यांनी, “मराठी अस्मिता आणि मराठी माणसाचे हितसंबंध पायदळी तुडवणाऱ्या भाजपच्या विरोधात रणशिंग फुंकायची तयारी आहे का? हा प्रश्न मांजरेकरांनी ठामपणे विचारणे अपेक्षित होते. मराठी अस्मितेसाठी निश्चित सकारात्मक विचार होऊ शकतो मात्र हे एकत्र येणे भाजपाचे मांडलिकत्व पत्करण्यासाठी असेल की स्वतंत्र राजकारणासाठी?”, असे लिहिले आहे.
कुटुंब म्हणून त्यांनी एकत्रित राहिले पाहिजे मात्र…
या व्हिडिओमध्ये सुषमा अंधारे म्हणाल्या की, “महाराष्ट्राच्या हितापुढे कोणाच्याही महत्त्वकांक्षा तितक्या महत्त्वाच्या नाहीत, हे राजसाहेबांनी केलेले विधान मला पटते. उद्धवसाहेब आणि राजसाहेब भाऊ भाऊ आहेत. कुटुंब म्हणून त्यांनी एकत्रित राहिले पाहिजे. पाण्यात काठी मारल्याने पाणी कधी तुटत नाही, असे माणणाऱ्यांपैकी मी एक आहे. मात्र, त्यांचे राजकारण एकत्रित असले पाहिजे का, यावर निश्चित चर्चा होऊ शकते.”
भाजपाचे मांडलिकत्व पत्करण्यासाठी की…
“महाराष्ट्राच्या हितसंबंधांसाठी आणि अस्मितेसाठी जर हे दोन भाऊ एकत्रित येत असतील तर, महाराष्ट्रातील प्रत्येक मनाला ते आवडेल. मात्र, ते एकत्रित येणे हे ज्या भाजपाने महाराष्ट्राच्या अस्मिता कायम पायदळी तुडवण्याचे राजकारण केले त्याच्या विरोधात बिगुल वाजवत विचारांची स्पष्टता ठेवत स्वतंत्र अस्मितेसाठी राजसाहेब सिद्ध होणार आहेत का? या प्रश्नाचे उत्तर मिळाले पाहिजे. महेश मांजरेकरांनी हा प्रश्न त्यांना विचारयला हवा होता की, तुम्ही एकत्र येण्याची गोष्ट करताय. पण, ते एकत्र येणे स्वतंत्र अस्मितेच्या राजकारणासाठी असेल की भाजपाचे मांडलिकत्व पत्करण्यासाठी असेल याबाबत स्पष्टता असली पाहिजे.”
दरम्यान राज ठाकरे यांनी आज महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत केलेल्या दाव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. यावर आता विविध राजकीय पक्षांचे नेतेही प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत.