कर्जत : ‘संघ स्वयंसेवक होणे पूर्वी अस्पृश्य मानले जात होते; मात्र आज संघ स्वयंसेवक असल्यावर त्याच्याकडे आदरपूर्वक पाहिले जाते, हा बदल देशामध्ये झाला आहे,’ असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अरुण भणगे यांना शिंदे यांच्या हस्ते दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी झालेल्या अभीष्टचिंतन सोहळ्यात सभापती शिंदे बोलत होते.
त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख व विश्वस्त हभप नवनाथ महाराज गांगुर्डे, विद्याभारती शिशुवाटिका विभागाचे प्रमुख सदाशिव उपाले, रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत संचालक नानासाहेब जाधव, जिल्हा संघचालक वाल्मीक कुलकर्णी, सेवा भारती विभागाचे सचिव प्रदीप सबनीस, उद्योजक भाऊसाहेब जंजिरे यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांसह रा. स्व. संघाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
राम शिंदे म्हणाले, ‘संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा इतिहास सांगितला. अरुणकाका भणगे यांच्यासारख्या देशातील लाखो स्वयंसेवकांमुळे या देशात एकाच विचारधारेचे सरकार देशामध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आले आहे आणि राज्यामध्ये संघाच्या विचाराचे सरकार सत्तेवर आहे. विरोधक आपल्याकडे येण्यासाठी आजही मोठ्या संख्येने रांगेत उभे आहेत. हा मोठा बदल झाल्याचे दिसते.’
सदाशिव उपाले यांनी आजची कुटुंब व्यवस्था, संस्कार आणि सद्य:स्थिती यावर परखड भाष्य केले. ‘देशामध्ये सण-उत्सव साजरे करताना हिंदू धर्म, संस्कृती बिघडत चालली आहे. अयोग्य पद्धतीने सण-उत्सव साजरे केले जातात,’ अशी टीका हभप नवनाथ गांगुर्डे यांनी केली. नानासाहेब जाधव यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक गजानन चावरे यांनी केले, तर उदय भणगे यांनी आभार मानले.