Ranajagjitsinha Patil on Anjali Damania allegation : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मुंढव्यातील जमीन खरेदी प्रकरणी अडचणीत आलेले असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर आणखी एक आरोप केला होता. “मुंबईतील ५०० कोटी रुपये खर्च करून बांधलेलं रुग्णालय अजित पवारांच्या पुतण्याला देण्याचा घाट घातल्याचा दावा दमानिया यांनी केला होता. या आरोपावर आता अजित पवारांचे पुतणे तथा तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
मुंबई महानगरपालिकेने ५०० कोटी रुपये खर्च करून गोवंडी येथे बांधलेलं शताब्दी रुग्णालय पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) या तत्वानुसार चालवण्यासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने रस दाखवला असल्याची एक बातमी नुकतीच टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केली होती. ही बातमी शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “आता आणखी एक ५०० कोटींचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना?”
अंजली दमानिया यांचा आरोप काय?
गोवंडीतील शताब्दी रुग्णालय हे पीपीपी तत्वानुसार चालवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी तीन निविदा आल्या होत्या. त्यापैकी एक निविदा ही तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्र्स्टने सादर केली होती. ही ट्रस्ट माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांची असून ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांचे सावत्र बंधू आहेत. तर, पद्मसिंह पाटलांचे पुत्र तथा अजित पवारांचे पुतणे राणा जगजीतसिंह पाटील हे तेरणा ट्रस्टचा कारभार पाहतात. राणा पाटील भाजपाचे तुळजापूरचे आमदारही आहेत. यावरून अंजली दमानिया यांनी म्हटलं होतं की “राज्यातील आणखी एक रुग्णालय अजित पवारांच्या नातेवाईकांना दिलं जाणार आहे.”
अंजली दमानिया यांच्या दाव्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर आता राणाजगजीत सिंह पाटील यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी यासंदर्भात फेसबूकवर एक पोस्ट केली आहे.
राणा जगजीतसिंह पाटलांचं उत्तर
फेसबूक पोस्टमध्ये राणा पाटील यांनी म्हटलं आहे की “अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या मुंबईतील शताब्दी रुग्णालयाच्या निविदा प्रक्रियेत तेरणा ट्रस्टने केवळ सहभाग घेतला आहे. यापूर्वी दोन ते तीन वेळा निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र कोणीही सहभागी झाले नाही. तिसऱ्यांदा निविदा निघाल्यानंतर तेरणा ट्रस्टने त्यात सहभाग घेतला. यात नेमकं चुकीचं काय झालं आहे? हे जरा आपण सांगू शकलात, तर बरं होईल! म्हणजे आपलं नेमकं म्हणणं काय आहे हे कळेल. आपल्या अजूनही काही शंका असतील, तर त्या दूर करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे. आपल्यासोबत चर्चा करून सगळी वस्तुनिष्ठ माहिती पुराव्यांसह दाखविण्याची माझी तयारी आहे.”
