जालना : शक्तिपीठ महामार्गाचा प्रतिकिलोमीटरचा खर्च १०४ कोटी रुपये एवढा असेल. मात्र, राष्ट्रीय महामार्गाकडून नितीन गडकरी यांचे खाते काम करते तेव्हा येणारा प्रतिकिलोमीटर खर्च जर ७२ कोटी रुपये होत असेल तर वरचे पैसे भ्रष्टाचाराचे का, असा सवाल उपस्थित करत आमदार रोहित पवार मराठवाड्यात सरकार विरोधाचा रोष एकत्रित करत आहेत. जालना जिल्ह्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यक्रमातून विरोध एकवटला जावा असे प्रयत्न सुरू झाले आहेत.

जालना येथे टीका करताना रोहित पवार म्हणाले, ‘ शक्तिपीठ मार्गाची मूळ योजना ८९ हजार कोटींची आहे. यामध्ये वाढ होऊन हा प्रकल्प १२० कोटी रुपयांपर्यंत जाईल. शक्तिपीठमार्ग आठशे किलोमीटर लांबीचा असून सहा पदरी रस्त्याच्या बांधकामासाठी प्रतिकिलोमीटर १०४ कोटी रुपये खर्च येईल. तर केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूने आठ पदरी राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात येत असून त्याचा खर्च प्रति किलोमीटर ७१ कोटी रुपये एवढा आहे. खर्चातील ही तफावत भ्रष्टाचार नाही का, असा प्रश्न करुन याचा हिशेब तुम्हीच करा, असे आवाहन पवार यांनी उपस्थितांना केले.

राज्यातील सध्याचे सरकार येण्यापूर्वी पिकांच्या नुकसानीबद्दल बागायतीस प्रतिहेक्टरी २७ हजार रुपये, जिरायती शेतीस १६ हजार रुपये मदत देण्याचा शासन निर्णय होता. परंतु जनतेची मते घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी रात्रीतून हा शासन निर्णय बदलला. नवीन निर्णयानुसार बागायती शेतीच्या नुकसानीसाठी बागाय‌तीची मदत प्रति हेक्टरी १६ हजार रूपये, जिरायती पिकांची ८ हजार ५०० रुपये एवढी कमी करण्यात आली. विशेष म्हणजे मदतीची मर्यादाही तीन हेक्टरवरून दोन हेक्टरपर्यंत कमी करण्यात आली.

निवड‌णुकीमुळे ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे पुरुषांनाही दिले. नंतर या योजनेतील २७ लाख पुरुषांची नावे कमी करण्यात आली सरकार कधीही ही योजना बंद करु शकते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर भाजपच यासंदर्भात एखाद्या व्यक्तीस न्यायालयात पाठविण्याची शक्यताही रोहीत पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिन्दे, जालना मतदार संघाचे काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार नीलेश लंके, महेबूब शेख, चंद्रकांत दानवे, माजी नगराध्यक्ष शफीकशेठ आदींची भाषणे यावेळी झाली. जालन्यातून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने अतिवृष्टीनंतर निर्माण झालेल्या रोष एकवटण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.