Mahadev Jankar on Evm: एकेकाळी महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रीपद भूषविणारे आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीतर्फे परभणी लोकसभेची निवडणूक लढविणारे महादेव जानकर आता भाजपावर टीका करत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे अनेक उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. महायुतीचा पाठिंबा असलेली फक्त एक जागा निवडून आली. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना ते म्हणाले की, मी एकटाच लढत आहे. मी देशभर फिरून पक्ष संघटन वाढविणार आहे. कारण भाजपाच फार वाईट अनुभव आलेला आहे आणि काँग्रेसचा अनुभव मला चाखायचा नाही. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभा घेतली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना महादेव जानकर म्हणाले, “महायुतीसाठी निकाल चांगला लागला असला तरी त्यांनी राज्यात विरोधी पक्ष ठेवलेला नाही. सरकार बनविण्यासाठी महायुतीला शुभेच्छा देतो. लवकर सरकार स्थापन करून राज्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे.” यावेळी जानकर यांनी ईव्हीएमवर खरपूस टीका केली. ते म्हणाले, ईव्हीएममुळे लोकशाही संपुष्टात येत आहे. याला विद्यमान सत्ताधारी जबाबदार आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष ईव्हीएमच्या विरोधात देशभर आंदोलन करणार आहे. विरोधक जर या आंदोलनात सामील होणार असेल तर त्यांचेही आम्ही स्वागत करू.

हे वाचा >> RSP chief Mahadev Jankar: पंतप्रधान मोदींनी ज्यांचा प्रचार केला, त्या महादेव जानकरांचा महायुतीवर गंभीर आरोप; म्हणाले, “वापरा अन् फेका…”

आय एम इंजिनिअर…

ईव्हीएम हॅक होऊ शकते का? या प्रश्नावर बोलताना महादेव जानकर यांनी आपल्या इंग्रजी बोलण्याच्या शैलीत या विषयावर भाष्य केले. “ईव्हीएम हॅक होते. आय एम अल्सो द इंजिनिअर. आय नो दॅट. विमान हॅक करता येते, सर्व काही हॅक करता येते. लोकशाही जिवंत ठेवायचे असेल तर त्यांनी मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी. आम्ही त्यांचे स्वागत करू.” जानकर पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालय, सर्व यंत्रणा, निवडणूक आयोग, माध्यमे अशा लोकशाहीच्या चारही स्तंभावर आज त्यांचे नियंत्रण आहे. त्यामुळे याला लोकशाही म्हणताच येणार नाही. ईव्हीएम बंद झालेच पाहीजे, अशी आमची मागणी राहणार आहे.

हा विजय नसून सूज आहे

विधानसभा निवडणुकीत वारेमाप पैशांचा वापर झाला. प्रत्येक गावात पैसे वाटले गेले. जर एका मतासाठी पाच-पाच हजार रुपये दिले जात असतील तर कसली लोकशाही आणि कसली विचारधारा.. आम्ही लोकांना आवाहन करत आहोत, विकल्या गेलेल्या समाजाचा नेताही विकला गेलेला असतो. उद्योगपतींनी निवडणुकीत अमाप पैसा वाटून लोकशाहीचा खून केला आहे. त्यामुळेच हा जो विजय झाला, तो विजय नसून विजयाची सूज आहे. एक दिवस जनताही याचा कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका महादेव जानकर यांनी केली.

हे ही वाचा >> “महादेव जानकर माझे लहान भाऊ”, परभणीत नरेंद्र मोदींचं विधान; प्रचारसभेत म्हणाले…

तुमचा एकच आमदार पक्षासह पळविला तर…

महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभेतून निवडून आले आहेत. त्यांनी महायुतीला उघडपणे पाठिंबा दिला आहे. गुट्टे यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षासारखा भाजपाला पाठिंबा दिला तर ते पक्षावर दावा करतील का? असा प्रश्न महादेव जानकर यांना विचारण्यात आला. यावर महादेव जानकर मिश्किलपणे उत्तर देताना म्हणाले, गुट्टे असे काही करू शकणार नाहीत. मी पक्षाचा संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहे. तांत्रिकदृष्ट्या सर्व चाव्या माझ्या हातात आहेत. शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी त्यांनी सर्व तांत्रिक बाबी गर्जे यांच्याकडे दिल्या होत्या आणि गर्जेंनी ते सर्व अजित पवारांना दिले. मी फार शहाणा आहे. मी पक्षाच्या सरचिटणीसांवरही विश्वास ठेवत नाही. सर्व सह्या मी स्वतः करतो. एबी फॉर्मवरही मीच सह्या करतो. शरद पवारांना असे केले नसेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rsp leader mahadev jankar big allegation on bjp over evm machine tempering says we oppose nationwide kvg