Maharashtra Assembly Elections 2024: राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख आणि धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांनी आता स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी परभणीत आले होते. कमळ चिन्ह महादेव जानकर यांनी घेतलेले नसतानाही पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या प्रचारार्थ सभा घेतली आणि माझ्या लहान भावाला लोकसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले होते. मात्र आता तीनच महिन्यात महादेव जानकर यांनी महायुतीवर गंभीर आरोप करून त्यांच्यापासून फारकत घेतली आहे.

द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या सविस्तर मुलाखतीमध्ये महादेव जानकर यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचे कारण सांगितले. जानकर म्हणाले, “महायुतीमध्ये आम्हाला दुय्यम वागणूक मिळत होती. आमचे अस्तित्वच त्यांना मान्य नव्हते. जागावाटपाची चर्चा करत असताना आम्हाला बैठकीला बोलाविण्याचेही सौजन्य दाखविले गेले नाही. फक्त भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातच चर्चा सुरू आहे. त्यांना फक्त आमची मते हवी आहेत. आम्हाला वापरा, फोडा आणि फेकून द्य, अशीच त्यांची नीती दिसते. आम्हाला १२ जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. पण फक्त तीन ते चार जागा देऊन आमची बोळवण केली जाईल, अशी माहिती आम्हाला मिळाली होती.”

हे वाचा >> “महादेव जानकर माझे लहान भाऊ”, परभणीत नरेंद्र मोदींचं विधान; प्रचारसभेत म्हणाले…

आमचा आमदार फोडला

महादेव जानकर पुढे म्हणाले, “२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाचे नेते राहुल कुल हे पुण्यातील दौंड मतदारसंघातून निवडून आले. २०१९ साली त्यांनी भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढविली. ते पुन्हा जिंकून आले. त्यामुळे महायुतीत लहान पक्षांचा टिकाव लागणे अवघड आहे. भाजपा कधीच लहान पक्षांना मोठे होण्यात मदत करत नाही. उलट आमच्यातील जिंकणाऱ्या उमेदवारांना ते स्वतःकडे घेऊन पक्षाला आणखी कमजोर करतात.”

“यामुळेच आता आम्ही स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात आम्ही जास्तीत जास्त उमेदवार उभे करणार आहोत. सत्तेत येणे किंवा मंत्रीपद मिळवणे हे आमचे लक्ष्य नाही. तर आम्हाला आम्हाला जास्तीत जास्त मते मिळवायची आहेत, जेणेकरून पक्ष म्हणून आमचे अस्तित्व कायम राहिल. आम्हाला किंगमेकरची भूमिकेत जायचे आहे. जर विधानसभेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर आमच्या आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरेल”, असेही महादेव जानकर द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

Story img Loader