Saif Ali Khan Attacked : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या मुंबईतील राहत्या घरात हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली असून मनोरंजन क्षेत्र आणि राजकीय वर्तुळातून या घटनेवर प्रतिक्रिया उमटत आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेबद्दल काही शंका उपस्थित केल्या होत्या. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी आव्हाडांना खडे बोलही सुनावले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घडलेल्या घटनेबद्दल माहिती देताना कदम म्हणाले की, “चोर घराच्या मागच्या भींतीवरून चढला होता. ही इमारत चार माळ्यांची आहे. इमारतीत सीसीटीव्ही कमी होते. त्यापैकी एका सीसीटीव्हीमध्ये त्याचा चेहरा समोर आला आहे. खबरींना त्याचा फोटो वितरित करण्यात आला आहे. लवकरच त्याला पकडले जाईल. यामध्ये कुठलाही गँगचा अँगल नाही”.

जितेंद्र आव्हाडांनी धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला असू शकतो अशी शंका उपस्थित केली होती. यावर प्रश्न विचारला असता कदम म्हणाले की, “फक्त सैफ अली खान याचं आडनाव खान आहे म्हणून आज विरोधक त्याचं राजकारण करत असतील तर मला त्यांची कीव येते. तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला सत्तेतून बाहेर फेकलं आहे. आता विरोधी बाकावर आहेत म्हणून तुम्ही काहीही बरळाल हे खपवून घेणार नाही”.

“जितेंद्र आव्हाड यांनी लक्षात घ्यावं की या घटनेला सामाजिक किंवा राजकीय रंग देणं म्हणजे त्यांची राजकीय परिपक्वता किती आहे हे त्यावरून लक्षात येतं. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गृह खातं काम करत असताना मुंबई हे जगातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जातं”, असेही गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले आहेत.

हल्ला करण्यामागे हत्येचा उद्देश होता का?

“त्या बिल्डिंगमध्ये पोलीस खात्याची कोणतीही सुरक्षा नव्हती, होती ती सर्व सुरक्षा ही खाजगी होती. सैफ अली खानचं घर चार माळ्याचं आहे आणि तिथं जास्त सीसीटीव्हीही नव्हते. म्हणून फुटेज मिळायला उशीर झाला. एका सीसीटीव्हीमधून त्याचा चेहरा समोर आला आहे. याला धार्मिक किंवा गँगचा रंग देणं चुकीचे ठरेल. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हे प्रकरण फक्त चोरीचे आहे” असेही गृहराज्यमंत्री कदम म्हणाले.

“फॉरेन्सिकने पुरावे गोळा केले आहेत, ते चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक अंदाज असा आहे चोर हत्येच्या उद्देशाने घरात शिरला होता असं वाटत नाही. अनोळखी व्यक्ती घरात घुसल्यानंतर त्याला थांबवण्याच्या प्रयत्नात कदाचित ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे. तपास पूर्ण होऊद्या”, असेही योगेश कदम म्हणाले.

आव्हाड काय म्हणाले होते?

आव्हाडांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहीले होते की, “सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव तैमुर ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते. ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे? या दिशेने ही तपास होणे आवश्यक आहे. कारण सैफ अली खान यांच्यावर एकूण सहा वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येत आहे.त्यातील दोन वार हे गंभीर स्वरुपाचे असल्याचे समजते.एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मनक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता, वार हा जिवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. सैफ अली खान हे भारतामधील चौथ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणार्‍या पद्श्री पुरस्काराने सन्मानित आहे. हे विशेष!”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan attack yogesh kadam slam jitendra awhad suspicion over stabbing incident mumbai safety marathi political news rak