Sambhaji Bhide : तारखेनुसार ६ जून रोजी किल्ले रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक नामशेष करावा, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यात तिथीनुसार आणि तारखेनुसार शिवराज्याभिषेक साजरा केला जातो. परंतु, ६ जून रोजी तारखेनुसार होणारा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यावरून तिथीनुसार होणाऱ्या शिवराज्याभिषेकाविषयी पत्रकारांनी विचारलं असता संभाजी भिडे म्हणाले, ६ जूनचा शिवराज्याभिषेक नामशेष केला पाहिजे. ७६ वर्षे झाली तरीही आपलं मानसिक अधिष्ठान ब्रिटिशांकडे स्वाधीन ठेवलंय. महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या तिथीप्रमाणेच शिवराज्याभिषेक स्मरण दिन केला पाहिजे. ६ जूनचा बंद केला पाहिजे.”

वाघ्या कुत्र्याची समाधी हटवू नका

रायगडावर असलेले वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवण्याची मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली होती. मात्र, या मागणीला संभाजी भिडे यांनी विरोध केला आहे. रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यात येऊ नये, असं संभाजी भिडे म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदेंच्या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा?

संभाजी भिडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत विचारलं असता ते म्हणाले, “आमच्या भेटीत देश, देव, धर्मावर चर्चा झाली. व्यक्तिगत किंवा राजकीय चर्चा झालेली नाही.”

वैष्णवी हगवणे प्रकरणावर काय म्हणाले संभाजी भिडे

“हुंडा पद्धत देशाला कलंक असलेली गोष्ट आहे. त्यामुळे हुंडा पद्धत नामशेष झाली पाहिजे.पण हे करताना राजकारण करता कामा नये”, असं संभाजी भिडे म्हणाले.

जयंत पाटील यांची संभाजी भिडेंवर टीका

आम्ही लहानपणापासून जो इतिहास शिकलोय, तो मोडून काढायचा आणि नवीन व्यवस्था सुरू करायची असा प्रयत्न काहीजण करत आहेत. आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत शिवराज्याभिषेक सोहळा याचं दुःख वाटण्याचं गरज काय? छत्रपती शिवाजी महाराजांविषयी देशाच्या मनात आदर आहे, त्यामुळे असे सोहळे होत असतील. त्यामुळे संभाजी भिडेंनी त्यांची दृष्टी तपासावी, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

“संभाजी भिडेंनी मत व्यक्त केलं असलं तरीही राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.