संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सोलापूरमध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अंगावर शाईफेक करत राडा केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. सोमनाथ राऊत असं शाईफेक करणाऱ्याचं नाव आहे. सोमनाथ राऊत सोलापूर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी भर पत्रकार परिषदेत सदावर्तेंवर शाईफेक का केली याविषयी विचारलं असता सोमनाथ राऊत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाईफेक का केली यावर बोलताना सोमनाथ राऊत म्हणाले, “आज भारतीय संविधान दिवस आहे. गुणरत्न सदावर्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहु महाराज आणि सर्व महापुरुषांच्या महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाले आहेत. त्यामुळे सदावर्तेंना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही हीच संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे.”

“हे सदावर्ते बोलत नसून ते भाजपाचं पिल्लू”

“आम्ही सदावर्तेंच्या अंगावर काळी शाई फेकली आणि काळे कापड दाखवून निषेध केला आहे. ते महाराष्ट्राकडे अशाच वाकडे नजरेने पाहत असतील त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. हे सदावर्ते बोलत नसून ते भाजपाचं पिल्लू आहे. भाजपाने महाराष्ट्र तोडायचा ठरवलं आहे. आम्ही हे होऊ देणार नाही. महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड जळवळ जीवंत आहे हे आम्ही भाजपाचं पिल्लू सदावर्तेंना सांगू इच्छितो,” असं मत सोमनाथ राऊत यांनी व्यक्त केलं.

नेमकं काय घडलं?

गुणरत्न सदावर्ते सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. सीमा प्रश्नावर बोलत असतानाच त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तिने त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी उपस्थितांनी या व्यक्तिला पकडले. मात्र, त्याचवेळी मागे उभ्या असलेल्या अन्य एका व्यक्तीने आपल्या खिशातून शाई काढून सदावर्तेंच्या अंगावर फेकली. तसेच काळे कापड दाखवत घोषणाबाजी केली.

व्हिडीओ पाहा :

सदावर्ते महाराष्ट्राचे तुकडे करत असल्याचा आरोप

हे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेड संघटनेचे आहेत. त्यांनी गुणरत्न सदावर्ते महाराष्ट्राचे तुकडे करत असल्याचा आरोप केला. तसेच सदावर्तेंच्या वेगळ्या राज्यांच्या मागण्यांचा निषेध नोंदवला. सदावर्तेंनी मराठा आरक्षणालाही विरोध केल्याचा मुद्दा उपस्थित करत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सदावर्तेंचा जाहीर निषेध अशीही घोषणाबाजी यावेळी झाली.

हेही वाचा : VIDEO: “स्वतंत्र मराठवाडाच नाही, तर मुंबईही केंद्रशासित प्रदेश करून दाखवू आणि…”, शरद पवारांचं नाव घेत सदावर्तेंचं मोठं वक्तव्य

शाईफेकीनंतर गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?

पत्रकार परिषदेतील राड्यानंतर गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “आज भारतीय संविधान दिन आहे. या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार, संजय राऊत, बिळातले तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पिलावळींना माझ्या संवाद यात्रेने सळो की पळो केलं आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji brigade tell why they throw ink on adv gunratna sadavarte pbs
First published on: 26-11-2022 at 13:58 IST