सांगली : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या घोषणाबाजीत सांगली संस्थानच्या गणेशाला हजारो भाविकांच्या उपस्थितीत निरोप दिला. गणेश दुर्गातील दरबार हॉलपासून गणरायाची सजविलेल्या रथातून ढोल, ताशा, लेझीमच्या निनादात शाही मिरवणूक काढण्यात आली. या वेळी भाविकांनी मिरवणुकीवर गुलाल, पेढे यांची उधळण करत गणेशाच्या नावाचा गजर केला.
दुपारी राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये सांगलीचे संस्थानिक विजयसिंह राजे पटवर्धन, युवराज आदित्यराजे पटवर्धन, जयदीप अभ्यंकर यांच्यासह जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे व राजघराण्यातील व्यक्तीच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. यानंतर सुशोभित करण्यात आलेल्या रथात श्रींची मूर्ती ठेवून सवाद्य मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
गणेश दुर्गापासून निघालेल्या विसर्जन मिरवणूक राजवाडा चौक, पटेल चौक, गणपती पेठ मार्गे गणेश मंदिराजवळ आल्यानंतर काही काळ थांबविण्यात आली. यानंतर टिळक चौकातून सरकारी घाटावर मिरवणूक मार्गस्थ झाली. सायंकाळी सूर्यास्तावेळी आरती करून संस्थानच्या मानाच्या गणेशाचे कृष्णा नदीत विसर्जन करण्यात आले.
मिरवणुकीमध्ये हजारो गणेश भक्त सहभागी झाले होते. तसेच नादब्रम्ह ढोल-ताशा पथक, सांगलीवाडीतील दत्तात्रय हरी चव्हाण माध्यमिक शाळेतील मुलीचे लेझीम पथक यांच्या निनादात आणि मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात गणेशाला निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणूक मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती, तर फुलांचा सडाही टाकण्यात आला होता. मिरवणुकीमध्ये युवा शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन चौगुले, दिगंबर जाधव, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आदी सहभागी झाले होते. पोलीस उपअधीक्षक श्रीमती विमला यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी विसर्जन मिरवणूक मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन केले होते.
गौराईचे आगमन
आज अनेक कुटुंबात गौराईचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. नदी, ओढा अथवा पाणथळ या ठिकाणाहून तांब्याच्या भांड्यातून सोनपावलांनी आलेल्या गौराईचे स्वागत करण्यात आले. गौराईच्या आगमनासाठी दारोदारी रांगोळ्या, फुलांची सजावट करण्यात आली होती. आज गौराईसाठी भाजी-भाकरीचा नैवेद्य करण्यात आला होता. सोमवारी मुखवट्याचे पूजन करून पुरणपोळीसह विविध खाद्य पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्यात येतो. अनेक कुटुंबातील श्रींचे गणेश विसर्जन आज करण्यात आले. यासाठी कृष्णा नदीकाठी गणेश भक्तांची उशिरापर्यंत गर्दी होती.
देखावे रात्री बारापर्यंत खुले
दरम्यान, सांगलीतील गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी खुले करण्यात आले असून पाचवा, सातवा, नववा या दिवशीच रात्री बारापर्यंंत देखावे पाहण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र, याबाबत विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, जनसुराज्य शक्तीचे समित कदम यांनी देखावे पाहण्यासाठी रात्री बारापर्यंतची परवानगी मिळावी अशी विनंती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. ही मागणी पालकमंत्री पाटील यांनी मान्य करून देखावे रात्री बारापर्यंत खुले ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले. मात्र, यावेळी कुठेही ध्वनिप्रदूषण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही कार्यकर्त्यांना दिल्या.
सांगली व मिरज शहरात अनेक सार्वजनिक मंडळांचे देखावे पाहण्यास खुले करण्यात आले असून विविध मंडळांनी नावीन्यपूर्ण कल्पनांना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. देखावे पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रेक्षकांची रस्त्यावर गर्दी होत असून त्यांच्यासाठी खाद्य पदार्थाचे ठेलेही चालू ठेवण्यास सहमती दर्शवण्यात आली आहे.