सांगली : जिल्हाधिकाऱ्यांचा बंदी आदेश डावलून चक्काजाम आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी खासदार, माजी आमदार यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तासगाव व कवठेमहांकाळ येथे मंगळवारी हे आंदोलन करण्यात आले होते. रात्री उशिरा दोन्ही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तासगावमध्ये मुख्य बसस्थानक चौकामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा बंदी आदेश मोडून चक्काजाम आंदोलन केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे विधानसभा निवडणुकीतील उमेदवार माजी खासदार संजय पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कवठेमहांकाळ तहसिल कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन केल्या प्रकरणी माजी खासदार पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असून कर्जबाजारी झाला आहे. त्याना कर्ज मुक्ती देण्याची जबाबदारी शासनाची आहे. ती तात्काळ मिळावी, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राचे सरसकट पंचनामे करावेत, नुकसान ग्रस्त शेतकर्यांना त्वरित व भरीव मदत मिळावी, ओला दुष्काळ जाहीर करून बँका, सहकारी सोसायटी यांच्या कर्जवसुलीस स्थगिती द्यावी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती जाहीर कराव्यात या मागणीसाठी मंगळवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. यामुळे वाहतूक व्यवस्था सुमारे दोन तास खोळंबली होती. तसेच कवठेमहांकाळ येथे तहसिल कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन केल्याने जत मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
जिल्हाधिकारी यांचा बंदी आदेश डावलून तासगाव बसस्थानक चौकात चक्काजाम आंदोलन केल्या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात सरकारच्यावतीने पोलीस कर्मचारी शहाजी साळुंखे यांनी फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये संजयकाका पाटील, प्रभाकर पाटील, प्रमोद शेंडगे, आरडी उर्फ रविंद्र पाटील, बाबासाहेब पाटील, जाफर मुजावर,सुदीप खराडे, माणिकराव जाधव, हेमंत उर्फ हणमंत पाटील, महेशदादा पाटील, कृष्णा पाटील आदी ११ जणांचा समावेश आहे.
कवठेमहांकाळ तहसिल कार्यालयासमोरील चौकात जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी आदेश असताना बेकायदेशीर जमाव जमा केल्या प्रकरणी माजी खासदार पाटील, माजी आमदार जगताप यांच्यासह किशोर पाटील, जनार्दन पाटील, मोहन खोत, खंडू होवाळे, विशाल उर्फ लाला वाघमारे, अजय पाटील, महादेव सुर्यवंशी, रणजित घाडगे, अजित माने, पिंटू माने आदी १३ जणांविरूध्द पोलीस कर्मचारी विकास सुतार यांनी सरकार पक्षातर्फे फिर्याद दाखल केली आहे.