Sanjay Raut criticize on Narendra Modi : मुंबईत आयोजित केलेल्या वेव्हज २०२५ या परिषदेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते. त्यांच्या उपस्थित मुंबईला नवी चित्रनगरी मिळाली आहे. या कार्यक्रमात अनेकविध कलाकारांनीही हजेरी लावली. एकीकडे काश्मीरमध्ये सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नट-नट्यांबरोबर वेळ घालवत असल्यावरून संजय राऊत यांनी टीका केली. ते आज माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “ज्या देशात युद्धाची तयारी असते त्या देशातील पंतप्रधान राजधानीतून बाहेर टंगळमंगळ करायला फिरत नाही. काश्मिरात एवढं मोठं हत्याकांड झालं, पण त्यानंतर आमचे पंतप्रधान बिहारला प्रचाराला गेले. इतकं मोठं हत्याकांड झालं, पाकिस्तानला धडा शिकवू म्हणाले, पण ९ तास ते नट-नट्यांबरोबर राहिले. देशात युद्धाची चर्चा सुरू असताना ९ तास पंतप्रधान नट-नट्यांबरोबर राहतात. काल फोटो आले, गौतम अदाणी यांच्या एका बंदराच्या उद्घाटनाला गेले. त्यांना मिठ्या मारल्या. आणखी एका कार्यक्रमात आंध्राचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्याबरोबर हास्यविनोद करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर युद्धाबाबत कसलीही चिंता दिसत नाहीत.”
“ज्या देशाला पाकिस्तान आणि चीनसारखा शेजार लाभला आहे, त्या देशात सतत युद्धसराव सुरूच असतो. पण सध्या सरकारचं वर्तन पाहता ते युद्धाला सामोरे जात आहेत, असं वाटत नाही. मोदींनी अद्याप युद्ध सुरू केलं नाही. त्यांची मानसिकता पाहावी लागेल”, असंही ते म्हणाले.
अमित शाहांचा राजीनामा घेतला पाहिजे
“देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला घरात घुसून मारण्याची भाषा केली. देशाच गृहमंत्री अमित शाह चुनचुन के मारेंगे म्हणाले. मग मारा ना. कोणी अडवलं? या सर्वाला जबाबदार अमित शाह आहेत. काश्मीरमध्ये जे हत्याकांड घडलंय, तसंच, गेल्या दहा वर्षांतील प्रत्येक हत्याकांडाला अमित शाह जबाबदार आहेत. तरीही मोदींनी त्यांना पदावर का ठेवलंय? २७ जणांचं हत्याकांड झालंय त्यात राज्यातील ६ माणसं आहेत. आमच्याच लोकांना चुन चुन के मारलंय. त्यामुळे अमित शाहांनी राजीनामा दिला पाहिजे”, असंही संजय राऊत म्हणाले.
“तुमचे पंतप्रधान ९-९ तास नटनट्यांबरोबर राहतात, साधा एक अमुक तमूक मेला तरी राष्ट्रीय शोक पाळला जातो, सरकारी कार्यक्रम रद्द केला जातो. पण पहलगामचा हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारदौऱ्यावर गेले. दुसऱ्यादिवशी बॉलिवूडच्या कार्यक्रमात जातात. कोणाच्या चेहऱ्यावर दुःखाची लकेर दिसत नाही. मोदींच्याही चेहऱ्यावर दुःख दिसलं नाही. भाजपाच्या किंवा प्रमुख लोकांच्या दुःखाचा, चिंतेचा लवलेश दिसला नाही”, अशी घणाघाती टीकाही संजय राऊतांनी केली.