Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. असं असतानाच भाजपाचे नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

‘सर्वांचे मोबाईल व व्हॉट्सअ‍ॅप सर्वेलन्सवर टाकले आहेत’, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी माध्यमांशी बोलताना केली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर इंडियन टेलिग्राफ ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करा आणि त्यांची चौकशी करा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचं पेगॅसिसचं मशीन स्वत: आणलेलं आहे का? की भाजपाच्या कार्यालयात लावलेलं आहे? किंवा त्यासाठी काही खासगी लोक कामाला लावले आहेत का?”, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

“हा विषय फक्त भाजपाच्या संदर्भात नसून महाराष्ट्रातील सर्व विरोधी प्रमुख नेत्यांचे देखील फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत. त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप पाहिले जात आहेत. हे आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण आणि मुंबईतील काही बिल्डर्स आणि नागपूरमधील काही यंत्रणा यांनी एकत्र येऊन एक वॉर रुम सुरु केलं आहे. त्या माध्यमातून शिंदे गटाच्या नेत्यांचेही फोन सर्व्हिलन्सवर आहेत”, असा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य काय?

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, “कार्यकर्त्यांचे मोबाईल व भंडाऱ्यातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स सर्वेलन्सवर टाकले आहेत. तुमचं मोबाईलवरील एक चुकीचं बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करेल. निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याच्या रागात एखादा कार्यकर्ता, पदाधिकारी तमाशा करतो, मात्र, आता कार्यकर्त्याने बंडखोरी केली तर त्या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांची दारं बंद होतील”, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

“तुमचं एक चुकीचं बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करेल. तुमच्या एका चुकीमुळे भंडारा शहराचं नुकसान होईल. तुमचं एक चुकीचं पाऊल भंडारा शहर उद्ध्वस्त करेल. निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली नाही तर रागाच्या भरात काही लोक तमाशा उभा करतात, चुकीचं मत व्यक्त करतात. तुमचं एक चुकीचं मत व तुमच्या बंडखोरीचा पक्षाला मोठा फटका बसेल”, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.