सातारा : संजय राऊत हेच पहिले गद्दार आहेत. पदासाठी ठाकरे यांना आघाडी करायला लावली, असा आरोप पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राऊत यांच्यावर केला. सातारा येथे पत्रकार परिषदेत बोलताना देसाई यांनी राऊत यांच्यावर टीका केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे आदी उपस्थित होते.

खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरीने आनंद दिघे यांचे छायाचित्र शिंदेसेना वापरत असल्याने एकनाथ शिंदे यांच्यावर केला होता. आनंद दिघे हे शिवसेनेत काम करत होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य सेनेत घालवले. बाळासाहेब ठाकरे यांनीही दिघे यांचे काैतुक केले होते. संजय राऊत हेच पहिले गद्दार आहेत. पदासाठी ठाकरे यांना आघाडी करायला लावली, असे जोरदार प्रत्युत्तर दिले.

छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्याबाबत त्यांनी राज्यात ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही. विनाकारण निवडणुकीला जातीय वळण देऊ नका. सर्व समाजानीच समजूतदारपणाची भूमिका घ्यावी, असे स्पष्ट केले. राज्य शासनाने पाटण तालुक्यातील पर्यटनाच्या नवीन पाच प्रस्तावांना मान्यता दिली असून निधीही मंजूर केला आहे. त्यामुळे ७० कोटींच्या या कामांना एक महिन्यात सुरुवात होईल. कामे पूर्ण झाल्यानंतर महाबळेश्वर-पाचगणीप्रमाणे पाटण तालुक्यातही पर्यटक आकृष्ट होतील. तसेच माथेरानच्या धर्तीवर वाफेवर चालणारी रेल्वे कोयनानगरला सुरू करण्याचा प्रयत्न आहे. महाबळेश्वर-तापोळा मार्गावरही सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव प्रगतीपथावर आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

देसाई म्हणाले, की पाटण तालुक्यात विविध ठिकाणी पर्यटन प्रकल्प होत आहेत. येथील विविध ठिकाणी निसर्ग पाहण्यासाठी गॅलरी, अत्याधुनिक विश्रांतीगृह, क्रीडा, साहसी खेळ असतील. पर्यटनासाठीची ही कामे ७० कोटी रुपयांची आहेत. या सर्व प्रकल्पांना ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आलेले आहे. एक महिन्यात प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.

गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य चुकीचे

आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्याबद्दल वक्तव्य केल्याचा प्रश्न करण्यात आला. यावरही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले. म्हणून मला वाटते की, पडळकर यांचे ते वक्तव्य चूक आहे. जो शब्द त्यांनी वापरला तो आम्हीही वापरू शकत नाही. तो शब्द खटकला, असे देसाई म्हणाले.